पालघर राष्ट्रीय महामार्गाची पुनर्रचना व्हावी; पालकमंत्री भुसेंनी घेतली गडकरींची भेट

0
825

नवी दिल्ली, दि. 24 : राज्याचे कृषीमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय भूपृष्ठ आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पालघर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 ची नियमानुसार पुनर्रचना व्हावी, अशी मागणी केली आहे.

भुसे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री स्मृती इरानी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. भुसे यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पालघर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 ची पुनर्रचना व्हावी, असा प्रस्ताव सादर केला. मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा हा राष्ट्रीय महामार्ग 217 किलो मिटरचा आहे. या महामार्गावर जड वाहनांचे सतत वहन होत असल्यामुळे या मार्गाची पुनर्रचना होणे गरजेच आहे. यासोबतच या महामार्गाचे त्र्यंबकेश्वर, जव्हार, नाशिक असे थोडे रूंदीकरण व्हावे, अशीही मागणी भुसे यांनी बैठकीत केली. यामुळे या परिसरात असणार्‍या तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाला हा महामार्ग पूरक ठरेल, असा विश्‍वास भुसे यांनी व्यक्त केला.

यासह कोथरेडीगज-सतना-मालेगाव-चाळीसगाव हा राज्य महामार्ग क्रमांक 19 हा दुपदरी रस्ता चौपदरी करावा अशी मागणी त्यांनी केली. राज्य महामार्ग 19 मालेगाव ग्रामीणला जोडून असल्यामुळे गुजरात, राजस्थान आणि दक्षिणेकडे तामिळनाडू आणि कर्नाटकला जातो. या महामार्गावर जड वाहनांची गर्दी होत असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण हे सीआरएफ निधीतून करावे, अशी मागणी भुसेंनी बैठकीत केली.

Print Friendly, PDF & Email

comments