पालघर जिल्ह्यावर आता नौसैनिकाच्या हत्येचा डाग; 30 वर्षीय नौसैनिकाला अपहरणकर्त्यांनी जिवंत जाळले

0
1753

पालघर, दि. 7 : गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात घडलेल्या साधू हत्याकांडामुळे देशभरात कुप्रसिद्ध झालेल्या पालघर जिल्ह्यावर आता नौसैनिकाच्या हत्येचा डाग लागला आहे. 10 लाखांच्या खंडणीसाठी चेन्नई येथून अपहरण केलेल्या एका 30 वर्षीय नौसैनिकाची अज्ञात अपहरणकर्त्यांनी डहाणूतील घोलवड भागातील जंगलात जिवंत जाळून हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पालघर पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे आव्हान ठाकले आहे.

सुरजकुमार मिथिलेश दुबे (रा. रांची, झारखंड) असे सदर नौसैनिकाचे नाव असुन ते इंडीयन नेव्हीमध्ये लिडींग सी मॅन या पदावर कार्यरत होते. 30 जानेवारी 2021 रोजी सुट्टी संपवून ते रांची येथुन विमानाने रात्री 9 वाजता चेन्नई विमानतळावर पोहचले. विमानतळाच्या बाहेर आल्यावर 3 अज्ञात इसमांनी रिवॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला. यानंतर त्यांना सफेद रंगाच्या एस.यु.व्ही. गाडीमध्ये बसवून चेन्नईतच अज्ञात स्थळी 3 दिवस डांबून ठेवले. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र दुबे यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना 5 फेबु्रवारी 2021 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घोलवडमधील वेवजी-वैजलपाडा येथील डोंगरावर नेले व त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जिंवत पेटवून दिले. स्थानिकांना दुबे जळालेल्या अवस्थेत दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत दुबे यांना प्रथम डहाणू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या घटनेत दुबे 90 टक्के भाजले होते. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील नौसैनिक रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले जात असताना दुर्दैवाने त्यांनी रस्त्यातच प्राण सोडले. दरम्यान, मृत्यूपुर्वी दुबे यांनी घडलेला घटनाक्रम पोलिसांसमोर कथन केला होता.

याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात घोलवड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302, 307, 364(अ), 392, 342, 34 सह भारतीय हत्यार अधिनियम 3 व 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन डहाणूचे उप विभागीय पोलीस अधिकारी धनाजी नलावडे अधिक तपास करीत आहेत.

  • आता नौसैनिकाच्या हत्येचा डाग…
    डहाणूतील गडचिंचले येथे गेल्या एप्रिल महिन्यात घडलेल्या साधू हत्याकांडमुळे पालघर जिल्ह्याचे नाव देशभर कुप्रसिद्ध झाले होते. आता नौसैनिकाच्या हत्येमुळे पुन्हा एकदा पालघर जिल्हा चर्चेचा विषय ठरत आहे. विश्‍व हिंदू परिषदे (विहिंप) चे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी ट्विटरवर या घटनेचा उल्लेख करत पालघरमध्ये आधी हिंदूद्रोह आणि आता राष्ट्रदोह अशा आशयाचे ट्विट केले आहे. तसेच याप्रकरणी उच्चस्तरीय तपासाची मागणी केली आहे. तर विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा केंद्रीय सहमंत्री विजय शंकर तिवारी यांनी देखील या घटनेवरुन ठाकरे सरकार निशाणा साधत पालघर साधू हत्याकांडाबाबत सरकार चुप व आता नौसैनिकाच्या हत्येवरही सरकार चुप असल्याची टिका केली आहे.
Print Friendly, PDF & Email

comments