डहाणू दि. 26 जानेवारी: दि डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेच्या कार्डिॲक ॲम्ब्युलन्सचे डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष मिहीर शहा, उपाध्यक्ष भावेश देसाई, बॅंकेचे संचालक, महाव्यवस्थापक जयंत बारी, अधिकारी व कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आता अवघ्या 11 हजार रुपयांमध्ये रुग्णाला मुंबईमध्ये उपचारासाठी हलविणे शक्य होणार आहे.

डहाणू व परिसरातील लोकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध वैद्यकीय उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका बाहेरगावाहून मागवावी लागत होती. त्यामध्ये वेळ व्यर्थ जात होता व अन्यत्र उपलब्ध रुग्णवाहिका सेवा महागडी ठरत होती. बॅंकेचे दिवंगत अध्यक्ष राजेश पारेख यांनी देखील अशी रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यातून आज ही सेवा उपलब्ध करण्यात येत असल्याचे प्रतिपादन बॅंकेचे अध्यक्ष मिहीर शहा यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी बोलताना, श्रीमती मित्तल यांनी रुग्णसेवेसाठी बॅंकेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले व असेच माणूसकीचे कार्य चालत रहावे अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर फित कापून रुग्णवाहिकेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. लोकार्पण सोहोळ्यापूर्वी श्रीमती मित्तल यांनी बॅंकेच्या संचालक मंडळाशी संवाद साधला व विविध प्रश्नांवर चर्चा केली.