सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात विद्यार्थी दत्तक योजना कार्यान्वित!

भाऊ दांडेकरांचे भरीव योगदान

0
1378
विद्यार्थी दत्तक योजनेसाठी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड्. जी.डी. तिवारी यांना धनादेश सुपूर्द करताना भाऊ दांडेकर. सोबत सचिव अतुल दांडेकर, कोशाध्यक्ष हितेंद्र शाह, डॉ. किरण सावे आणि डॉ. पायल चोलेरा.

पालघर, दि. 12 : सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात विद्यार्थी दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे रोजगार व व्यवसाय बुडाले आहेत. त्यामुळे अशा पालकांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरणे जड जात आहे. असे विद्यार्थी शिक्षणाच्या मुळ प्रवाहामध्ये कायम राहावेत आणि शैक्षणिक संधीपासून ते वंचित राहू नयेत, तसेच त्यांच्या पालकांवरचा आर्थिक बोजा काही प्रमाणात सुसह्य व्हावा म्हणून सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीने दानशूर व्यक्तींना आवाहन करुन गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याकरीता विनंती केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. जी.डी. तिवारी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक दानशूर व्यक्ती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यास तयार झाले आहेत. संस्थेचे सदस्य असलेले जनार्दन पुरुषोत्तम दांडेकर उर्फ भाऊ दांडेकर यांनी बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी., आय.टी., सी.एस., बीएमएस, बॅफ आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकणार्‍या 20 गरीब व गरजू मुलांचे एक लाख पन्नास हजार इतक्या रक्कमेचे शैक्षणिक शुल्क भरुन त्या मुलांना मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वी देखील भाऊ दांडेकर यांनी सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीला पाच लाख रुपये इतकी भरीव देणगी दिली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी भाऊ दांडेकर यांचे अभिनंदन करताना हा दत्तक योजनेचा प्रवाह आणखी पुढे जाईल आणि त्याचा जास्तीत जास्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना लाभ मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर अ‍ॅड्. तिवारी आणि सर्व पदाधिकार्‍यांनी विद्यार्थी दत्तक योजनेसाठी आर्थिक सहाय्य करणार्‍या देणगीदारांचे अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments