धक्कादायक : विराज कंपनीमध्ये कामगाराचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला!

कंपनी प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड

0
3315

बोईसर, दि. 5 : येथील तारापूर औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) मोठा उद्योग समुह असलेल्या विराज प्रोफाईल लिमिटेड या कंपनीत एका कामगाराचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. लालसिंह बहुरा असे सदर कामगाराचे नाव असुन मागील आठवड्याभरापासुन तो बेपत्ता होता. विशेष म्हणजे या कामगाराचा मृतदेह सडेपर्यंत त्याची साधी चाहूलही कंपनी व्यवस्थापनाला लागली नाही. दुर्गंधी येत असल्याने शोध घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, लालसिंहने गळफास घेतला की त्याची हत्या करुन त्याला फासावर लटकावण्यात आले याबाबत तपासात काय निष्पन्न होते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसरमधील दांडीपाडा भागात राहणारे 42 वर्षीय लालसिंह चिमन बहूरा हे मागील 12 वर्षांपासुन विराज कंपनीमध्ये कामाला होते. 29 डिसेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामाला जायला घरातून बाहेर पडले. मात्र 24 तास उलटूनही घरी परतले नाही. ते ओव्हरटाईम करायला थांबले असतील या विचारातून 30 डिसेंबरपर्यंत त्यांच्या कुटूंबियांनी त्यांची कोणतीही चौकशी केली नाही. मात्र त्यानंतरही ते घरी न परतल्याने 31 डिसेंबर रोजी कुटूंबियांनी कंपनी गाठत चौकशी केली. यावेळी कंपनीच्या सुरक्षारक्षकाने हजेरी तपासली असता 29 डिसेंबर रोजीच रात्रीच्या सुमारास लालसिंह कंपनीतून बाहेर पडल्याची नोंद दिसुन आली. त्यामुळे कुटूंबियांनी त्यांची आसपासच्या परिसरात शोधाशोध केली. मात्र त्यानंतरही ते मिळून न आल्याने अखेर 1 जानेवारी रोजी बोईसर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली.

तक्रार दाखल होऊन तीन दिवस उलटल्यानंतर 4 जानेवारी रोजी लालसिंहच्या कुटूंबियांना कंपनीतून फोन आला व त्यांचा कंपनीतच गळफास घेलतेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याचे सांगण्यात आले. ही खबर मिळाल्यानंतर बोईसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनाला पाठवला.

दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रदिप कसबे यांच्याशी संपर्क साधला असता, 1 जानेवारी रोजी लालसिंह यांची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यांचा शोध सुरु असतानाच 4 जानेवारी रोजी कंपनीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पाण्याच्या टाकीला जोडलेल्या पाईपला गळफास घेतलेल्या अवस्थेत लालसिंहचा मृतदेह आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. तर मृतदेह सडेपर्यंत तो कोणाच्याही निर्दशनास कसा आला नाही? असा सवाल उपस्थित केला असता लालसिंह कंपनीत पाणी सोडण्याचे काम करत असत. त्यामुळे पाण्याची टाकी असलेल्या भागात त्याच्याशिवाय इतर कुणाचाही वावर नसल्याने तसेच टाकीजवळ बांधलेल्या शेडमुळे लालसिंहचा मृतदेह कुणालाही दिसुन न आल्याने हा प्रकार कुणाच्याही लक्षात न आल्याचे कसबे म्हणाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले असता त्यात लालसिंहने आत्महत्या केल्याचे नमुद असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

  • कंपनी व्यवस्थापनाचा अक्षम्य बेजबाबदारपणा!
    आपल्या कंपनीतील कामगार मागील आठवडाभरापासुन बेपत्ता असताना व विशेष म्हणजे त्याचा मृतदेह कंपनीच्या आवारातच आढळून आल्याने कंपनी व्यवस्थापनाने आपल्या कामगाराला शोधण्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याचे या घटनेवरुन सिद्ध होते. पोलिसांनी देखील या प्रकरणात गांभिर्याने लक्ष न घातल्याचे दिसुन येते.
Print Friendly, PDF & Email

comments