पालघर जिल्ह्यातील 6 तालुक्यांतील वीजग्राहकांची 109.62 कोटींची देयके थकीत; थकीत वीजबिल भरण्याचे अधिक्षक अभियंत्या सौ. किरण नागावकरांचे आवाहन

0
1170

पालघर, दि. 4 : पालघर जिल्ह्यातील (ग्रामीण) 6 तालुक्यातील सुमारे दिड लाखांहून अधिक लघुदाब व उच्चदाब वीज ग्राहकांची करोनाकाळ सुरु झाल्यापासुन तब्बल 109 कोटी 62 लाखांची वीज देयके थकीत असल्याने महावितरणचे पालघर जिल्हा मंडळ अडचणीत आले आहे. या थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी महावितरणतर्फे मोहिम आखण्यात आली असुन, संबंधित ग्राहकांनी आपले वीजबिल लवकरात लवकर अदा करावे, असे आवाहन महावितरणच्या पालघर मंडळाच्या अधिक्षक अभियंत्या सौ. किरण नागावकर यांनी केले आहे.

पालघर, डहाणू, जव्हार, तलासरी, विक्रमगड व मोखाडा अशा 6 तालुक्यातील सुमारे 14 लाख 993 लघुदाब व 93 उच्चदाब वीज ग्राहकांची वीज देयके मार्च-एप्रिल महिन्यापासुन थकीत आहेत. यात लघुदाब ग्राहकांची 72.96 कोटींची तर उच्चदाब ग्राहकांची 36.66 कोटींची अशी एकुण 109 कोटी 62 लाखांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे महावितरणच्या अडचणी वाढल्याने वीजबिल वसुलीसाठी मोहीम आखण्यात आली असुन, अधिकार्‍यांना आपल्या कार्यक्षेत्रातील वीजबिल वसुलीसाठी सर्व ग्राहकांना वीजबिलांविषयी असलेल्या सर्व शंका दूर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून थकबाकी वसुलीसाठी महावितरण अधिकार्‍यांना गावपातळीवर सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांपासून ते जिल्हास्तरावर पालकमंत्री, खासदार व आमदारांची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे लोकप्रतिनिधी थकीत वीजबिलाची वसुली किती महत्वाची आहे, हे ग्राहकांना सांगून भरणा करण्यासाठी प्रोत्साहित करतील, अशी अपेक्षा महावितरणला आहे.

दरम्यान, मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर सुरक्षेसाठी 21 मार्चपासून मीटर वाचन व बील वाटप बंद करण्यात आले. तसेच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी वीज बील भरणा केंद्रही बंद करण्यात आली. ग्राहकांच्या सोयीसाठी ऑनलाईन बील भरण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. परंतू ऑनलाईन बील भरण्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी थकबाकी वाढत गेली. 15 जूनपासून टप्याटप्याने मीटर वाचन व बील वाटप सुरु केले. परंतु वसुलीचे प्रमाण खूप कमी राहिले. लॉकडाऊन काळात तीन महिन्याचे एकत्रित रिडींग प्रमाणे बील देण्यात आले. परंतु वीज बिल न भरल्याने थकबाकी वाढत गेली. बिलाबाबत शंका असलेल्या ग्राहकांना तीन महिन्याचे बील महावितरणकडून समजावून सांगण्यात आले. तसेच विविध स्तरावर शंका दूर करण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या. त्यामुळे काही प्रमाणात वीज बिल भरण्यात आली असली तरीही लाखो ग्राहकांचे वीजबील थकबाकी आहे. परिणामी अशा ग्राहकांचा थकबाकीचा आकडा फुगत चालला असल्याची माहिती महावितरणने दिली.

वीजबिले थकीत असलेल्या ग्राहकांनी लवकरात लवकर आपली वीजबिले भरुन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन सौ. नागावकर यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments