वाढवण बंदरामुळे पालघरचा विकास होणार, स्थानिकांनी पाठिंबा द्यावा! -केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

0
2225

पालघर, दि. 3 : जिल्ह्यातील वाढवण समुद्र किनारी होऊ घातलेल्या बंदरामुळे लाखोंच्या संख्येने रोजगार निर्माण होणार आहे. पर्यायाने या बंदरामुळे जिल्ह्याचा विकास होणार असल्याने स्थानिक मच्छीमारांनी या बंदराला विरोध न करता पाठिंबा द्यावा, अशी विनंता वजा आवाहन रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. या बंदराबाबत स्थानिक मच्छीमारांचे जे प्रश्‍न आहेत, ते समजून घेण्यासाठी आपण लवकरच या भागाला भेट देणार असुन त्याचा अभ्यास करुन दिल्लीत संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.

आज, 3 डिसेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पक्षाच्या बैठकीसाठी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. यानिमित्ताने त्यांची पालघर येथील शासकिय निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. येथे पत्रकारांशी संवाद साधताना आठवले यांनी पालघर जिल्ह्यासह राज्यातील व देशभरातील विविध विषयांवर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर, कोरोनाची स्थिती, भुमिहिनांना भूखंडाचे वाटप, दिल्ली बॉर्डरवर शेतकर्‍यांचे सुरु असलेले आंदोलन, औरंगाबादचे नामकरण यांसह विविध विषयांवर त्यांनी आपले मत मांडले. यापैकी जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा व वादग्रस्त विषय असलेल्या वाढवण बंदराबाबत सविस्तर भूमिका मांडतांना आठवले म्हणाले की, केंद्र सरकार 65 हजार कोटी रुपये खर्चून वाढवण बंदर उभारत आहे. पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच अशाप्रकारचा मोठा प्रकल्प होत असल्याने या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे एक ते सव्वा एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत. या बंदरामुळे जे स्थानिक लोक विस्थापित होणार आहेत, त्यांना केंद्र सरकार योग्य मोबदला देणार असुन त्यांचे चांगल्या प्रकारे पुनर्वसन करणार आहे. बंदरामुळे येथील मासेमारी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण स्थानिकांच्या भावना व तक्रारी समजून घेण्यासाठी लवकरच वाढवणला भेट देणार आहे. यानंतर केंद्र सरकारच्या कानावर या बाबी टाकून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आठवले म्हणाले. तरी एकुणच या बंदारमुळे निर्माण होणारे लाखो रोजगार व त्यामुळे होणारा पालघर जिल्ह्याचा विकास लक्षात घेता स्थानिकांनी या बंदराला विरोध न करता पाठिंबा द्यावा, असे आवाहन आठवले यांनी केले.

वाढवण बंदरावरुन प्रतिप्रश्‍न करताना पत्रकारांनी, तारापूर अणुउर्जा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या अनेकांचे आजही योग्य प्रकारे पुनर्वसन न झाल्याचे किंबहुना प्रकल्पामध्ये त्यांना कंत्राटी पद्धतीनेही नोकरी मिळत नसल्याची बाब आठवलेंपुढे मांडली. यावर अशा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करुन असे ते म्हणाले.

दरम्यान, पत्रकार परिषदेपुर्वी आठवले यांनी पालघर जिल्ह्यातील प्रश्‍नांबाबत पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्याशी चर्चा केली. या पत्रकार परिषदेस आठवलेंसह त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांनी काय भूमिका मांडली ती माहित नाही. पण त्यांनी जर प्रस्तावित वाढवण बंदराचे समर्थन केले असेल तर मी इतकेच म्हणेन की, स्थानिक जनतेच्या समस्या आणि विकास याबाबत आठवलेंपेक्षा स्थानिकांना अधिक समज आहे.
नारायण पाटील,
अध्यक्ष, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती

Print Friendly, PDF & Email

comments