संजीव जोशी यांची डहाणूरोड जनता बॅंकेच्या संचालकपदी निवड

0
1341

दि. 29 डिसेंबर: दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांची दि डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह बॅंकेचे दिवंगत अध्यक्ष राजेश पारेख यांचे चिरंजीव वरुण पारेख आणि सौ. उन्नती राऊत यांचीही संचालकपदावर निवड करण्यात आली आहे. बॅंकेचे अध्यक्ष मिहीर शहा, उपाध्यक्ष भावेश देसाई व संचालक मंडळाने बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

बॅंकेचे संचालक संजय कर्णावट हे संचालकपदासाठी निवडणूक लढविताना बॅंकेचे पिग्मी एजंट होते. निवडून आल्यानंतर त्यांनी पिग्मी एजंट म्हणून राजीनामा दिला असला तरी ते तांत्रिक कारणात्सव संचालक पदासाठी अपात्र ठरले होते. त्यामुळे त्यांची जागा दीर्घकाळ रिक्त राहिली. दरम्यान 2 महिन्यापूर्वी बॅंकेचे अध्यक्ष राजेश पारेख यांचे अकाली निधन झाल्यामुळें त्यांची जागा रिक्त झाली. त्याचवेळी बॅंकेचे तत्कालीन उपाध्यक्ष ॲड. रमेश नहार यांनीही राजीनामा दिल्यामुळे त्यांची जागा देखील रिक्त झाली.

बॅंकेने रिक्त जागा भरण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती. बॅंकेकडे संजीव शशिकांत जोशी, वरुण राजेश पारेख, सुप्रिया रविंद्र फाटक व उन्नती सतेज राऊत असे 4 नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी सुप्रिया फाटक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे 3 रिक्त जागांवर 3 उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. संजीव जोशी हे मराठी पत्रकार परिषदेचे (मुंबई) अखिल भारतीय सरचिटणीस आहेत. वरुण यांच्याकडे पारेख कुटूंबीयांचा सामाजिक कार्याचा वसा घेऊन उतरलेला तरुण या दृष्टीने पाहिले जाते तर सौ. उन्नती ह्या माजी मुख्याध्यापिका असून त्या बॅंकेचे माजी संचालक शिवराम राऊत यांच्या स्नुषा आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments