महामार्गावर तब्बल 50 लाखांचा गुटखा जप्त

0
1958

तलासरी, दि. 28 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी चेकपोस्ट (तलासरी) येथे पोलिसांनी दोन आयशर टेम्पोंमधुन तब्बल 50 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एकुण 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पकडण्यात आलेला गुटखा मुंबईत विक्रीसाठी नेला जात असल्याचे समजते.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल 27 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास महामार्गावरील दापचरी चेकपोस्टवर पोलीस वाहनांची तपासणी करत असताना एम.एच. 48/ए.जी. 3718 व एम.एच 46/बी.बी. 5592 या क्रमांकाच्या आयशर टेम्पोंमध्ये गोणींमध्ये भरुन गुटख्याचा साठा मुंबईच्या दिशेने नेला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही ट्रकची तपासणी केली असता विमल पानमसाला, व्ही-1 तंबाखु, शुध्द प्लस पानमसाला व शुध्द प्लस तंबाखु असा एकुण 50 लाख 22 हजारांचा हा गुटखा असल्याचे समोर आले.

पोलिसांनी गुटख्यासह दोन्ही टेम्पो जप्त करत मोहम्मद रिजवान नजीर खान (वय 40 रा. पनवेल), राकेश रामसमुज कोरी (वय 30, रा. उत्तरप्रदेश) तसेच गुलजार, फैझल व अशरफ (पुर्ण नाव व पत्ते कळू शकले नाहीत) अशा पाच जणांवर तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. तर मोहम्मद खान व राकेश कोरी यांना अटक करण्यात आली असुन अधिक तपास सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email

comments