पालघरमधील प्रसिद्ध व्यावसायिक जुबेर धनानीवर बलात्काराचा गुन्हा; गुन्हा दाखल झाल्यापासुन बाप-बेटे फरार!

0
3017

पालघर, दि. 28 : पालघर जिल्ह्यातील दुचाकी वाहन विक्री करणारे प्रसिद्ध उद्योजक इकबाल धनानी यांचा मुलगा जुबेर धनानीवर एका 29 वर्षीय महिलेने अपहरण करून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी जुबेरवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडितेला शिविगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी इकबाल धनानी व जुबेरचा भाऊ आसिफ धनानी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हा दाखल झाल्यापासुन तिघेही फरार झाले आहेत.

पीडितेच्या तक्रारीनुसार, इकबाल धनानी हे मेमन समाजाचे अध्यक्ष असल्याने आपल्या बहिणीच्या सासरी झालेल्या वादासंदर्भात पीडिता धनानी यांच्या घरी गेली होती. त्यावेळी तिची जुबेरशी तोंडओळख झाली होती. यावेळी जुबेरने तिचा मोबाईल नंबर घेतला होता. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाल्यावर जुबेरने पीडितेला लग्नाचे आश्‍वासन दिले व तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून ती दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर मला लग्नाअगोदर मुल नको आहे, असे सांगून जुबेरने बोईसरमधील सरावली येथील साई साक्षी हॉस्पिटलमध्ये गेल्या 26 सप्टेंबर रोजी तिचा गर्भपात घडवून आणला. गर्भपातानंतर जुबेरने पीडितेशी पुर्णपणे संपर्क तोडल्याने पीडितेने त्याचे वडील इकबाल धनानी यांना 10 डिसेंबर रोजी फोन करुन त्यांच्या प्रेमाबद्दल माहिती दिली. तसेच जुबेर माझ्याशी विवाह करणार असल्याचे त्यांना सांगितले.

यावर संतापलेल्या इकबाल यांनी पीडितेला तिच्या गरिबीचा दाखला देत तुम्ही श्रीमंतांकडून पैसे उकळण्यासाठी त्यांच्या मागे लागतात असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच आपल्या मुलापासुन दुर रहा अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडिता जुबेरच्या मोबाईलवर फोन करत असल्याचे पाहिल्यानंतर जुबेरचा भाऊ आसिफ हा पीडितेच्या घरी पोहोचला व तिथे त्याने पीडितेच्या कुटूंबियांना शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर 22 डिसेंबर रोजी जुबेरने पीडितेला फोन करुन आपल्याला काही तरी महत्वाचे बोलायचे आहे असे सांगून तिला बोईसरमधील त्यांच्या शोरुमजवळ बोलावले. पीडिता तिथे पोहोचल्यानंतर जुबेरने तिला बळजबरीने आपल्या फॉर्च्युनर कारमध्ये बसवले व नांदगाव परिसरातील निर्जणस्थळी नेले. येथे तिच्यावर त्याने गाडीतच बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घटनेच्या दोन दिवसानंतर (24 डिसेंबर) पीडितेेने पालघर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी जुबेर विरोधात अपहरण व बलात्कार तसेच त्याचे वडिल व भावावर शिवीगाळ, दमदाटी व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच तिघेही बेपत्ता झाले असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments