
डहाणू दि. 19: तालुक्यातील नरपड ग्रामपंचायतीच्या हद्दीत आणखी एक प्रताप समोर आला आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या बांधकाम परवानग्या डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी बेकायदेशीर ठरवल्या आहेत. इमारतीचे विकासक ट्रेव्हर लुईस डिसोझा यांना 5 लक्ष 39 हजार 506 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बिनापरवानगी अकृषिक वापर केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असली इमारतीचे आराखडे मंजूर नसल्याने ती जमिनदोस्त केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नरपड येथे ग्रामपंचायतीने बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार नसताना व केवळ ना हरकत पत्र देणे अपेक्षीत असताना विकासक ट्रेव्हर यांना मौजे नरपड येथील भूमापन क्र. 88/14/1 मध्ये 569 चौरस मीटर क्षेत्रावर 3 इमारतींच्या बांधकाम परवानग्या दिल्या. ट्रेव्हर यांनी नगररचना विभागाकडून बांधकाम आराखडे मंजूर करुन न घेता व जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी न मिळवता वैशाली अपार्टमेंट, मोनालुईस अपार्टमेंट व डेरीक अपार्टमेंट अशा 3 इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामध्ये 24 सदनिका व 4 दुकाने असून 18 कुटूंबे वास्तव्यास आहेत.
क्रिस्टोफर जिवारातराम जेरीम यांनी याबाबत डहाणूच्या तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. ज्या इमारतीमध्ये ट्रेव्हर यांनी इमारत बांधली ती जागा कुटूंबाच्या सामाईक मालकीची असल्याचा दावा क्रिस्टोफर यांनी केला आहे. त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय इमारती बांधल्याने क्रिस्टोफर यांनी तहसिल कार्यालयाकडे तक्रार केली होती.