बंदी असलेल्या मागूर माशांचे संवर्धन; विक्रमगडमध्ये तिघांवर गुन्हे

0
1404

* मत्स्यविभागाची कारवाई, 100 किलो मागूर मासळी व सुमारे 10 ते 12 लाख मागूर माशांची अंडी नष्ट

पालघर, दि. 16 : पर्यावरणाचा र्‍हास करणार्‍या तसेच आरोग्यास अपायकारक ठरणार्‍या मागूर माशांवर देशभरात बंदी असताना विक्रमगड तालुक्यात या माशांचे संवर्धन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत माहिती मिळताच मत्स्यविभागाने संबंधित बीज केंद्रावर छापा टाकत 100 किलो मागूर मासळी व सुमारे 10 ते 12 लाख मागूर माशांची अंडी नष्ट केली आहेत. तसेच याप्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन यात एका स्थानिकाचा तर मुंबईतील दोघांचा समावेश आहे. पालघर मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयातील तपासणी अधिकारी पथकाने स्थानिक पोलीस विभागाच्या मदतीने ही धडक कारवाई केली.

मुंबईतील माहीम येथील आजिम खान सईद अख्तर व जोगेश्वरी येथील गुलाम शेख हे दोघे विक्रमगडमधील शिंपीपाडा- सुकसाळ येथील स्थानिक कुलदीप पाटील याच्या जागेतील पॉल्ट्री शेडच्या बाजूला प्रतिबंधीत मागूर माशांचे प्रजनन व संवर्धन करत असल्याची गुप्त तक्रार 13 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांना प्राप्त झाली होती. यानंतर सहाय्यक आयुक्तांना तात्काळ मुंबई प्रादेशिक उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयातील मत्स्यव्यवसाय अधिकार्‍यांचे एक पथक स्थापन करून तसेच विक्रमगड पोलिसांचे सहकार्य घेऊन सदर बीज केंद्रावर धडक कारवाई केली. या पथकाने 100 किलो मागूर मासळी प्रजनक व सुमारे 10 ते 12 लाख मागूर माशांनी प्रजनन केलेली अंडी नष्ट करुन केंद्र बंद पाडले. याप्रकरणी कुलदीप पाटील, आजिम खान सईद अख्तर व गुलाम शेख यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 188 व 34 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असुन अधिक तपास सुरु आहे.

ठाणे-पालघर मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद पालव, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी दिनेश हंसराज पाटील, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सुरेंद्र गावडे व संदीप जाधव, पोलीस हवालदार एस. व्हि. मोरे, वाहन चालक महावीर जगताप, शिपाई महाले आदींचा प्रत्यक्ष कारवाईत सहभाग होता.

  • मागूर माशांवर बंदीमागील कारणे :
    मागूर माशांचे संवर्धन करताना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळण्यासाठी या माशाला खाण्यायोग्य नसलेले कोंबडीचे मांस तसेच कत्तलखान्यातील कुजलेले शेळी/मेंढी, गाई, म्हैशी यांचे मांस खाद्य म्हणून दिले जाते. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याचे आढळून येते. तसेच या माशाचे सेवन केल्यास मानवी आरोग्यास हानीकारक ठरते. हा मासा अतिशय मांसभक्षक असल्यामुळे इतर माशांचे मत्स्यपालन करण्यात क्रियाशिल व अधिकृत मासेमारी व्यवसाय करणार्‍या मत्स्यकास्तकारांना अडचणी निर्माण होतात. तसेच संवर्धन करण्यात येणार्‍या माशांचे हे मागूर मासे मोठ्या प्रमाणात भक्षण करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तलाव/जलाशयातील पारंपारीक मासे जसे कटला, रोहू, मृगल व सायप्रिन्स आदी माशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसते. भारतीय प्रजातींना या माशांमुळे धोका निर्माण होत असल्याने या प्रतिबंधीत मागूर माशांचे प्रजनन, संवर्धन, विक्री, वाहतुक व अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने आहेत.
Print Friendly, PDF & Email

comments