प्रदूषण रोखण्यासाठी तारापूर औद्योगिक क्षेत्रात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मनाई

0
648

पालघर दि. 7 : तारापूर एमआयडीसीतील अनेक उद्योजक खाजगी टँकर्सद्वारे आपल्या कंपन्यांमध्ये पाणी मागवत असल्याने येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या सीईटीपी केंद्रावर अतिरिक्त भार पडत आहे. तसेच या टँकर्सच्या माध्यमातून कंपन्यांतील सांडपाण्याची बेकायदेशीररित्या आसपासच्या परिसरात व्हिलेवाट लावून पर्यावरणाचा र्‍हास केला जात असल्याने तारापूर एमआयडीसीत आता टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

नवी दिल्लीतील राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाने आपल्याकडे दाखल दावा क्र. 64/2016 मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथील उद्योगांचे सर्वेक्षण करत असताना बरेचसे टँकर पाणी वाहून नेत असताना आढळले व विविध प्रकारच्या घातक टाकाऊ रसायनांची वाहतूक करुन त्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावून सभोवतालच्या परिसरातील पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याचे समोर आले. तसेच टँकरद्वारे पाणी उपलब्ध करुन पाण्याचा वापर अधिक होत असल्याने, त्यानुसार अधिकचे सांडपाणी तयार होऊन अस्तित्वात असलेल्या 25 एमएलडी सीईटीपी केंद्रावर विपरीत परिणाम होत असल्याचे महामंडळाच्या निर्दशनास आले आहे.

त्यामुळे येथे पाणी पुरवठा करणारे टँकर बंद केल्यास पाण्याचा वापर कमी होऊन कमी सांडपाणी तयार होईल व याची परिसरामध्ये प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. या उद्देशाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, तारापूर येथे पाण्याचा पुरवठा करणार्‍या टँकरची वाहतूक करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (2) व (3) आणि कलम 133 अन्वये 5 डिसेंबर 2020 पासून ते 2 फेबु्रवारी 2021 पर्यंतच्या कालावधीत मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये फायरटेंडर वाहने वगळण्यात आली आहेत व असाधारण परिस्थितीत पाण्याच्या टँकरची वाहतूक करावयाची झाल्यास एमआयडीसीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे.

तरी तारापूर एमआयडीसीतील सर्व औद्योगिक, उद्योग व इतर आस्थापनांनी या मनाई आदेशाचे पालन करण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्याकडून करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments