एसीजी कॅप्सुल कंपनीच्या विस्तारीकरणाच्या ‘मॅनेज’ ना हरकत दाखल्याची विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंकडून झाडाझडती

0
2043

डहाणू तालुक्यातील आशागडस्थित एसीजी कॅप्सुल या औषधाच्या रिकाम्या कॅप्सुल बनविणाऱ्या कंपनीला प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणे व ग्रामसभेने विस्तारीकरणास परवानगी नाकारली असताना ग्रामसेवकास मॅनेज करुन ना हरकत पत्र मिळविणे महागात पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांनी ह्या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत आज (24 नोव्हेंबर) सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांची बैठक आपल्या दालनात बोलावली आहे. या बैठकीत आशागड ग्रामपंचायतीचा मनमानी करणारा ग्रामसेवक मनोज इंगळे याच्यासह त्याचे पराक्रम पोटात घालणारे जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची झाडाझडती घेतली जाणार आहे.

एसीजी कॅप्सुल विषयी प्रमुख मुद्दे काय आहेत?

  • एसीजी कॅप्सुल कंपनी सांडपाण्यावर प्रक्रीया करीत नाही. यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी प्रदूषित झाले आहे. परिसरातील शेतजमिनी खराब झाल्या आहेत. कॅप्सुलमध्ये खाण्याचे रंग मिसळले असल्यामुळे आणि जिलेटीन हे कॅप्सुलद्वारे पोटात जात असल्याने त्यापासून होणारे प्रदूषण आरोग्यास हानिकारक नाही असा चमत्कारिक दावा करुन परिसरातील लोकांची बोळवण केली जाते.
  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परिसरातील पाण्याचा नमुना परिक्षणासाठी न नेता मॅनेज होऊन स्वच्छ पाण्याचा नमुना नेतात व पाणी प्रदूषित होत नसल्याचा दाखला देतात.
  • डहाणू तालुक्यात 1991 पासून उद्योगबंदी असल्याने एसीजी कॅप्सुल कंपनीला विस्तारीकरणास परवानगी मिळाली नव्हती. परंतु कंपनीने मशिनींची संख्या तीच ठेवून मागील बाजूने विस्तार केला व दुप्पट क्षमतेच्या मशिन बसवल्या व बेकायदेशीरपणे विस्तार केला. सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी आवश्यक पाणी त्यासाठी न वापरता उत्पादनासाठी वापरण्यात आले.
  • प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संगनमत करुन ‘शून्य’ सांडपाणी तत्वावर व संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रीया करुन पुनर्वापर तत्वावर विस्तारीकरण शक्य असल्याचा निर्वाळा देत डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची परवानगी मिळवली. प्रत्यक्षात कंपनीकडे अतिरिक्त पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध नसल्याने अस्तीत्वातील प्रदूषणात अधिक भर पडण्याचा धोका उद्भवला आहे.
  • पेसा कायदा लागू असलेल्या आशागड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने आधी अस्तीत्वातील प्रदूषण बंद करा व मगच विस्तारीकरणास ना हरकत पत्र दिले जाईल असे ठरवून ना हरकत पत्र नाकारले.
  • कंपनीने लगतच्या दुसऱ्या ग्रामसभेमध्ये आपल्या सर्व कामगारांना सुट्टी देऊन गर्दी जमा केली व आयत्या वेळेच्या विषयामध्ये विस्ताराला परवानगी देणारा ठराव मंजूर करण्याचा डाव टाकण्यात आला. लगतपूर्व ग्रामसभेत परवानगी फेटाळली असताना व विषयपत्रिकेत विषय नसल्याने काही ग्रामस्थांनी हरकत घेतली व विषय चर्चेत न घेता गोंधळाच्या वातावरणात सभा विसर्जित झाली.
  • प्रत्यक्षात ठराव झालेला नसताना व झाला असता तरी तो नियमबाह्य ठरला असता अशी परिस्थिती असताना ग्रामसेवक मनोज इंगळे याने इतिवृत्तांतामध्ये खोटी नोंद करुन कंपनीला ना हरकत पत्र दिले. कंपनीने त्यासाठी भ्रष्ट्र मार्गांचा अवलंब केल्याचा आरोप आहे.

काही जागृत नागरिकांनी या प्रकरणाचा विविध मार्गाने पाठपुरावा चालू ठेवला. मात्र मनोज इंगळेला त्यावेळी चिखले व नरपड ग्रामपंचायतीचा कार्यभार असताना याच कामासाठी आशागडच्या तिसऱ्या ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याने दखल घेतली गेली नाही. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी यांनी मनोज इंगळेच्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करुन कारवाई करण्याचे निर्देश उप कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांना दिले होते. मात्र चव्हाण यांनी कायम पाठराखण करण्याची भूमिका घेतल्याचे समोर येत आहे. दरम्यान कोणीच दाद घेत नसल्याचे पाहून ग्रामस्थांनी डहाणूचे कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष मोरे यांच्या मार्फत विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांच्याकडे कैफियत मांडली. पटोले यांनी उपायुक्तांमार्फत चौकशी लावली. उपायुक्तांनी जिल्हा परिषदेला चौकशी करण्यास सांगितले. टी. ओ. चव्हाण चौकशी लावून त्या दिवशी अनुपस्थित राहिले. मात्र नाना पटोले यांनी आपल्या दालनात बैठक लावून ‘तारीख पे तारीख’ चा सिलसिला संपुष्टात आणला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments