हॅलो बोईसर… येथील आमदार, खासदार, कामगार नेते असहाय्यांच्या आयुष्यातील अंधार प्रत्यक्षात दूर करतील काय?

0
859

संजीव जोशी, संपादक दैनिक राजतंत्र

दि. 14 नोव्हेंबर: बोईसर उद्योगनगरीच्या अनेक समस्या आहेत. त्या दुर्लक्षित आहेत. समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते आपापल्या स्तरावर प्रयत्नशील असतात. काही प्रयत्न प्रामाणिक असतात, तर काही प्रयत्न फोटोपुरते असतात. बोईसरचे सर्वच प्रश्न एका रात्रीत मिटणार नाहीत. पण काही प्रश्न आपण त्वरित सोडवू शकलो नाहीत तर ते आपल्या सर्वांना नामुष्कीचे ठरणार आहे. बोईसरचे पालकत्व ज्यांच्या डोक्यावर आहे ते खासदार राजेंद्र गावीत आणि आमदार राजेश पाटील स्वाभाविकपणे दीपावलीनिमित्त जनतेला ” अंधकार दूर करण्यासाठी दिवे लावणाऱ्या ” शुभेच्छा भरभरून देतील. पण एखाद्या परवेश दर्शनच्या आयुष्यात त्याच्या हक्काची पणती जाळून त्याला कायमचे अपंगत्व येणार नाही यासाठी प्रयत्न करु शकतील का? करणार असाल तर त्याचे स्वागत आहे. आणि तुम्हाला ते जमणार नसेल तर तुम्हाला निवडून देणाऱ्या जनतेचे ते दुर्दैव आहे. कामगार नेते कामगारांच्या हितांचे रक्षण करु शकत नसतील तर परिस्थिती अवघड आणि लज्जास्पद आहे. मागासवर्गीय परवेशच्या डोक्यावर वडिलांचे छत्र नाही. कमावता मुलगा जायबंदी झाल्यानंतर त्याची विधवा आई पदर पसरुन शक्य तिथे न्याय मागण्याचा प्रयत्न करीत आहे. पण न्याय त्यांच्यापासून कोसो दूर आहे.

काय आहे परवेशचा प्रश्न?

तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. एच 1 मधील लविनो कपूर कॉटन्स ह्या कारखान्यात कंत्राटी कामगार असलेल्या परवेशचा 8 डिसेंबर 2019 रोजी मशिनमध्ये हात गेल्याने जायबंदी झाला होता. त्याच्यावर बोईसरच्या आनंद हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मात्र त्याचा हात पूर्ववत झालाच नाही. त्याला अपंगत्व आले आहे. परवेशच्या हातावर पुन्हा शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. त्यासाठी 40 हजार खर्च येईल. हे पैसे परवेशकडे नाहीत आणि कंपनी व्यवस्थापन हा खर्च करायला तयार नाही. लॉक डाऊनमध्ये परवेशला न्याय देऊ शकणाऱ्या अनेक यंत्रणा मृतावस्थेत असल्याने परवेशचा एमआरआय रिपोर्ट काढण्यासाठी 9 महिन्यांचा काळ गेला. नियमाप्रमाणे जोपर्यंत परवेश काम करु शकत नाही तोपर्यंत त्याला पगार मिळणे अपेक्षीत आहे. मात्र त्याला कंपनीने एक दमडी देखील दिलेली नाही. दैनिक राजतंत्रने विषय हाताळल्यानंतर काहीशी सुत्रे हलली. परवेशचा एम.आर.आय. काढण्यात आला मात्र त्यापुढील शस्त्रक्रिया करुन देण्यास लविनो कपूर कंपनीने नकार दिला आहे. इएसआयसीचा हप्ता आम्ही भरल्यामुळे आमची काहीच जबाबदारी नाही असे कंपनीचे म्हणणे आहे. परवेश कडे वैद्यकीय उपचाराची कुठलीही कागदपत्रे देण्यात आली नव्हती. आता काहीशी कागदपत्रे देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये डॉ. संतोष संगारे यांचे 9 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. प्रमाणपत्रामध्ये असे नमूद आहे की, परवेश अनफिट असून त्याला पुढील शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला मात्र तो त्याने मानलेला नाही. परवेश आणि त्याची आई पुढील शस्त्रक्रिया होण्यासाठी वणवण फिरताहेत. उलट त्याला फिटनेस प्रमाणपत्र देऊन प्रश्न निकाली काढण्याचा प्रस्ताव नाकारण्याइतके भान त्यांच्याकडे होते. तरीही वैद्यकीय प्रमाणपत्र हे परवेशची बेपर्वाई प्रतिबिंबीत करते आहे. ह्या प्रश्नात कारखाना निरिक्षक पाटील यांनी कंपनीला क्लिन चीट दिलेली आहे. पोलिसांकडे अपघाताची नोंद नाही. कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर परवेश साठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र कंपनी व्यवस्थापन त्यांना फाट्यावर मारते आहे. आता परवेशने कोणाकडे जायचे?

खासदार व आमदार महोदय, तुम्हाला हे सहज शक्य आहे. तुम्ही परवेशला न्याय मिळवून देऊ शकाल. कंपनी व्यवस्थापन आणि शासकीय यंत्रणा कदाचित तुम्हालाही दाद देणार नाही. तुमची देखील नामुष्की होऊ शकते. पण निष्क्रीयतेच्या नामुष्कीपेक्षा अपयशाची नामुष्की चालेल. त्यानंतरही शासकीय रुग्णालयात तुम्ही परवेशवर मोफत शस्त्रक्रिया करुन घेऊ शकाल. तो शासकीय लाभ घेण्यास पात्र आहे. तुम्ही नक्कीच परवेशच्या आयुष्यात अंधकार नष्ट करणारी एक पणती लावू शकता. बोईसरच्या कामगार नेत्यांनी देखील या निमित्ताने स्वतःमधील कामगार नेतृत्वाचे गुण तपासून घ्यायला हरकत नाही.

अशा सर्व परवेशना ही दीपावली अंधारातून उजेडाकडे नेणारी ठरो ही शुभेच्छा!

Print Friendly, PDF & Email

comments