पैशांचा पाऊस पाडणे पडले महागात – फसवणूक व त्यातून कायदा हातात घेतल्याने परस्परांविरोधात 3 गुन्हे दाखल!

0
1218

पालघर, दि. 4 नोव्हेंबर: पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली फसवणूक करणे व पैसे डबल करण्याच्या आमिशाला बळी पडणे दोन्ही पक्षांना महागात पडले असून जवळपास 14 जणांना जेलची हवा खावी लागणार आहे. कासा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एकाच गुन्ह्यातून उद्भवलेल्या 3 साखळी गुन्ह्यांची उकल झाली आहे. 2 नोव्हेंबर रोजी एका अपहरणाच्या गुन्ह्यातून एक संपूर्ण फिल्मी मालिका समोर आली आहे.

मोखाडा येथील सुरेश भिवा काकड, खानवेलचा रमण भावर, जूनी जव्हारचा कमळावर वाघ व प्रमोद भामरे यांनी संगनमत करुन निरप विश्वकर्मा या वापी येथील इसमाला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी 1 ऑक्टोबर 2020 कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रात्यक्षिक दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. 15 ऑक्टोबर रोजी आरोपींनी विश्वकर्मा याच्याकडील 2 लाख 40 हजार रुपये दुप्पट करण्यासाठी जंगलात विश्वकर्माचे डोळे बांधून मंत्र जपण्याचा बनाव केला. आणि पैसे घेऊन पळून गेले.

सुरेश भिवा काकड व इतर यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसांकडे धाव न घेता व्यवहारातील मध्यस्थी असलेल्या रमण देवू भोवर याने स्वतःच कायदा हाती घेतला. त्याने मनोज मावजी मोर, अरविंद सोबण बिज व गोविंद जन्या वाढू यांच्या मदतीने सुरेश भिवा काकड याच्याकडून 2 लाख 40 हजार रुपये परत मागितले. त्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी सुरेशला टवेरा गाडीतून जंगलात नेले व झाडाला बांधून मारहाण केली. सुरेशचा मुलगा भास्कर याला फोन करुन धमकी देण्यात आली की, 2 लाख 40 हजार रुपये घेऊन ये, नाहीतर सुरेशला मारुन टाकू. मात्र कासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी जाऊन सुरेश भिवा काकडची सुटका केल्याचा पोलीसांचा दावा आहे.

दुसऱ्या दिवशी, 2 नोव्हेंबर रोजी सुरेशचा मुलगा भास्कर याने अविनाश भोये, रियाझ अख्तर शेख, तेजस गवार, सुनील माळी व अन्य 3 आरोपींच्या मदतीने पुन्हा बदला घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरेशचे अपहरण करणाऱ्यांपैकी गोविंद जन्या वाढू याला तलवारीचा धाक दाखवून त्याला मोटारसायकलवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सायवन पोलीस चौकी येथून नेले जात असताना गोविंदने मदतीची हाक दिली व मोटारसायकलवरुन उडी मारुन स्वतःची सुटका करुन घेतली. तेथे नेमणूकीस असलेले पोलीस नाईक भरसट यांनी तत्परता दाखवून स्थानिकांच्या मदतीने 2 आरोपींना ताब्यात घेतले.

आता या प्रकरणी पहिल्या (15.10.2020) घटनेत कासा पोलीसांनी फसवणूक व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा (क्र. 187/2020) दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेबद्दल (1.11.2020) व तिसऱ्या घटनेबद्दल कासा पोलीसांनी अपहरण व खंडणीचे गुन्हे (अनुक्रमे दाखल क्र. 185/2020 व 186/2020) दाखल केले आहेत. तीनही गुन्ह्यांचा कासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments