पालघरमध्ये राहणारा तरुण निघाला मोठा ठग; ३९ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात होता फरार

0
2426

पालघर, दि. 31 : विक्रमगडमधील जंगल परिसरात संशयास्पदरित्या वावरणार्‍या एका 32 वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्याने पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात मोठा ठग अडकला आहे. मोहम्मद वसीम अब्दुल माबद खान (सध्या रा. पिलेना नगर, पालघर) असे त्याचे नाव असुन त्याच्यावर हैद्राबाद येथील एका ज्वेलर्स व्यापार्‍याची 39 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, 30 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांना विक्रमगड तालुक्यातील तलवाडा धोडीपाडा येथील एका खबर्‍याने आपल्या गावातील जंगल परिसरात मागील दोन दिवसांपासुन एक इसम संशयास्पदरित्या वावरत असल्याची माहिती दिली होती. गायकवाड यांनी सहायक फौजदार सुनील नलावडे व पोलीस हवालदार संतोष निकाळे यांना सदर ठिकाणी पाठवून त्या तरुणाला ताब्यात घेतले व त्याला बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले. येथे त्याची कसुन चौकशी केल्यानंतर आपल्यावर अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याने आपण तेथून फरार झाल्याचे व सध्या पालघर येथे लपवून राहत असल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांनी या गुन्ह्याबाबत अधिक माहिती मिळवल्यानंतर, हैद्राबाद येथील ज्वेलर्स व्यापारी पवनकुमार नलामोथू साईबाबा नायडू यांना मोहम्मद व त्याच्या तीन साथिदारांनी 39 लाखांचा गंडा घातल्याचे पुढे आले. या आरोपींनी महिन्याभरापुर्वी मोबाईल फोनद्वारे नायडुंना संपर्क साधून तुम्हाला कमी किंमतीत 1 किलो सोने देतो असे सांगून मुंबईत बोलावले. यानंतर त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून वेळोवेळी 39 लाख रुपये रोखीने घेऊन त्यांना बनावट सोने सोपवले. आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर नायडू यांनी अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली होती. तेव्हापासुन पोलीस या आरोपींच्या मागावर होते.

दरम्यान, मोहम्मद खानला पुढील कारवाईसाठी अंधेरी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments