लॉकडाऊनमध्ये पैशांसाठी त्याने ‘ते’ व्हिडीओ विकले; विक्रमगडचा युवक पोलिसांच्या ताब्यात

सुमारे 15 मुलींसोबत दुष्कर्म

0
1251

विक्रमगड, दि. 31 : गरजू तरुणींना नोकरी मिळवून देण्याच्या अमिषाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून व त्यानंतर त्यांच्यासोबत शारिरिक संबंध बनवून छुप्या पध्दतीने त्याचे चित्रीकरण करणार्‍या एका 32 वर्षीय तरुणाला पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. मिलिंद अनिल झडे असे सदर तरुणाचे नाव असुन लॉकडाऊन काळात पैशांची गरज भागवण्यासाठी त्याने सदर व्हिडीओ पॉर्न साईटला विकल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत समोर आल्याचे समजते. या नराधमाने सुमारे 15 मुलींसोबत हे दुष्कर्म केल्याची माहिती समोर आली आहे.

विक्रमगड तालुक्यातील पोचाडे गावात राहणारा आरोपी मिलिंद झडे ठाणे ठाणे महानगरपालिका परिवहन सेवे (टीएमटी) मध्ये कंडक्टर म्हणून कामाला होता. काही दिवसांपुर्वी त्याच्याविरोधात विक्रमगड व वसईतील वालीव पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. तर आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळाल्यानंतर तो जव्हार-विक्रमगड परिसरातील जंगलात लपून बसला होता. पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर असताना काल, शुक्रवारी तो पाचमाड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक भीमसेन गायकवाड यांनी आपल्या पथकासह सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, बसप्रवासादरम्यान गरजू तरुणींशी ओळख करुन तो त्यांना टीएमसीमध्ये नोकरी लावून देण्याचे आश्‍वासन द्यायचा. पुढे त्यांच्याशी जवळीक वाढवून आपल्या प्रेमात ओढायचा. तरुणींचा विश्‍वास संपादीत केल्यानंतर तो त्यांना निर्जणस्थळी नेऊन त्यांच्यासोबत शारीरिक संबंध बनवायचा व त्याचे छुप्या पध्दतीने चित्रीकरण करायचा. लॉकडाऊन काळात घरी बसल्यानंतर पैशांची गरज भागविण्यासाठी त्याला स्वत:कडील व्हिडीओ पोर्न वेबसाईटला विकण्याची युक्ती सुचली व यानंतर तो सदर व्हिडीओ पॉर्नसाईटसला विकू लागला.

अशाप्रकारे त्याने जवळपास 15 मुलींसोबत दुष्कर्म केले असल्याची माहिती पुढे आली असुन अधिक तपास सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email

comments