डहाणू दि. 29: येथील चांदीचे सुप्रसिद्ध घाऊक व्यापारी योगेश धाडणकर यांचे कोरोना संसर्गामुळे अकाली निधन झाले आहे. ते 53 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील हरिकिशन, आई सुमित्रा, पत्नी मीना, पुत्र मितुल व उर्वेश असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे योगेश यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी योगेश व त्यांची पत्नी मीना यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटूंबाने स्वतःला क्वारन्टाईन करुन घेतले होते. दरम्यान योगेश यांना कुठलीही लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्या पत्नीमध्ये लक्षणे दिसल्यामुळे पत्नीला वापी (गुजरात) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्नीला रुग्णालयात दाखल करावे लागल्यामुळे योगेश यांनीही रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना कुठलाही त्रास जाणवला नव्हता. मात्र अचानक मंगळवार, दि. 27 रोजी रात्री त्यांचे रुग्णालयातच निधन झाले. काल सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या पत्नीची तब्येत स्थीर असली तरी एकाच रुम मध्ये एकत्र उपचार घेत असताना हा मृत्यू झाल्यामुळे मानसिक धक्का बसला आहे.