आयपीएलवर सट्टा : पालघर पोलिसांचा मनोरमध्ये छापा; 19 जणांवर कारवाई

0
1822

पालघर, दि. 29 : आयपीएल स्पर्धेच्या 27 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर सट्टा लावणार्‍या 19 जणांवर पालघर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. सर्व आरोपी मुंबईतील विविध भागातील रहिवासी असुन यात एका बुकीचाही समावेश आहे.

मनोरमधील मस्ताननाका भागात असलेल्या प्राईड इंडिया शान कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये जुगाराचा अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती पालघरचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर शिंदे यांच्या आदेशाने तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन सदर टिकाणी छापा टाकला असता 19 जण येथे आयपीलवर सट्टा लावत असल्याचे आढळून आले.

दिपक तुळशीदास ठक्कर (रा. मुलुंड), कमलेश दिनेश ठक्कर (रा. मुलुंड), अमर (रा. बोरीवली), हरेश (रा.बोरीवली), प्रकाश (रा.विलेपार्ले), अरुण दुबे (रा.बोरीवली), प्रशांत (रा. दहिसर), धमा (रा.कांदिवली), हर्ष (रा.कांदिवली), पार्थ (रा.कांदिवली), विशाल (रा.बोरीवली), आशिष (रा.बोरीवली), महेश रोहित (रा.बोरीवली), मयुर बंगालीया, इब्राहिम (रा.दहिसर) व अभिषेक अशी सदर आरोपींची नावे असुन इतर आरोपींची नावे समजू शकलेली नाही.

  • हे आरोपी आपल्या मोबाईल फोनद्वारे ORDS EXCH, DIAMOND EXCH, www.Lotusbook365.com, galaxyexch9.com, TIMEXSPORT, www.lotusbook247.bet आदी अप्लिकेशन तसेच व्हॉट्सअपच्या सहाय्याने आयपीलच्या सामन्यांवर सट्टा लावत होते. दरम्यान, सर्व आरोपींवर मनोर पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन दिपक तुळशीदास ठक्कर व कमलेश दिनेश ठक्कर यांना अटक करण्यात आली आहे.

पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक शिवाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रताप भोस व अभिजित टेलर यांच्या पथकाने ही कारवाई केली. मनोर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments