पालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न!

प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई करण्याचे पालकमंत्री भुसे यांचे निर्देश

0
1925

मुंबई, दि. 20 : बोईसर-तारापूर औद्योगिक क्षेत्रांतील प्रदुषण आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून प्रभावी कामगिरी करावी. तसेच येत्या महिन्याभरात प्रदूषणपातळीत कमालीची घट आणण्याकरीता प्रयत्न करावेत, असे निर्देश पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

पालघर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बोईसर व वसई येथील औद्योगिक क्षेत्रात येणार्‍या विविध अडचणी, प्रदूषण, अपघात, सांडपाणी प्रक्रीया केंद्र या संदर्भात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, कामगार उपायुक्त औद्योगिक सुरक्षा मंडळाचे अधिकारी, पालघरचे उपविभागीय अधिकारी डी. एस. नेरकर आदींसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

भुसे यावेळी म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रोजगाराला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबरोबर निर्माण होणार्‍या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे आवश्यक आहे. यंत्रणांनी समन्वयातून ही कामगीरी करताना ते प्रत्यक्षात दिसले पाहिजे. यापूर्वी या औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या दुर्घटनांना जे विभाग जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी गांभीर्याने काम करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जे कारखाने प्रदुषण नियंत्रणाचे निकष पाळणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा. पुढील महिन्यापर्यंत या संदर्भात प्रभावी कारवाई करतानाच या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदुषण कमी होण्याकरीता वृक्षारोपण मोहिम हाती घेण्याची सूचना देखील भुसे यांनी यावेळी केली.

Print Friendly, PDF & Email

comments