बोईसर, दि. 19 : तारापूर व बोईसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल जबरी चोरींच्या गुन्ह्यात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना हुलकावणी देऊन पालघरमधील कोळगाव जंगल परिसरात फरार झालेल्या बोईसर येथील दोन आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. जयनंदन गणेश पासवान (वय 25) व राहुल गणेश पासवान (वय 26) अशी सदर फरार आरोपींची नावे असुन दोघेही बोईसरमधील सिडको भागातील रहिवासी आहेत. तर सध्या दोघेही कोळगाव गणेश मंदिरच्या मागे राहत होते.
तारापूर व बोईसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल जबरी चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात हे दोन्ही आरोपी निष्पन्न झाले आहेत. पालघर स्थानिक गुन्हे शाखेतर्फे या दोघांचा शोध घेतला जात असतानाच कोळगाव गणेश मंदिरच्या मागे राहणार्या शंकर सुखदेव पाटोळे या इसमाच्या घरी हे दोघे आरोपी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक काल, रविवारी सदर ठिकाणी कारवाईसाठी पोहोचले. मात्र पोलिसांची चाहूल लागल्याने दोन्ही आरोपी कोळगावच्या जंगलात पसार झाले. हे दोन्हीही आरोपी अर्धनग्न अवस्थेतच फरार झाले आहेत. तरी आरोपींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास पालघर नियंत्रण कक्ष क्रमांक 9730711119/9730811119, एसडीपीओ बोईसर शैलेश काळे (7020352004), पीआय (एलसीबी) रवींद्र नाईक (9867112787), बोईसरचे पीआय प्रदीप कसबे (7020715230) किंवा तारापूर पोलिस स्टेशनचे एपीआय संतोष जाधव यांच्या 9594945354 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.