आजचे विद्यार्थी होणार उद्याचे जागरुक नागरीक; पालघर पोलीस दलाकडुन जिल्ह्यातील 26 शाळांमध्ये स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रामचे आयोजन

0
724

पालघर, दि. 16 : पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे सन 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षात स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले असुन जिल्ह्यातील 26 शाळांमधील 8 वी व 9 वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाद्वारे विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे आजचे हे विद्यार्थी उद्याचे जागरुक नागरीक बनणार आहेत. या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या 26 शाळांमध्ये पालघर, सातपाटी, डहाणु, तलासरी, जव्हार, विक्रमगड आदी भागातील शाळांचा समावेश आहे.

या कार्यक्रमासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून 16 हजार रुपये पर्यंतचा निधी शैक्षणिक साहित्य तसेच खेळाचे साहित्य खरेदी करण्याकरीता खर्च केला जाणार आहे. तसेच निवड अभ्यासक्रम सुरु करण्याबाबतही केंद्रातर्फे सुचना करण्यात आल्या आहेत. यादृष्टीने जिल्हा शिक्षण अधिकारी श्रीम. लता सानप व पालघर गट शिक्षण अधिकारी यांच्या मिटिंग घेऊन त्यांना अभ्यासक्रमाची रुप रेषा कळविण्यात आली आहेत. तसेच अंतर्वग व बाह्मवर्ग प्रशिक्षण कोणत्या प्रकारे देण्यात येणार आहे, याबाबत पीपीटीद्वारे माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्यक्षात वर्ग घेण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांकडील साधनांची उपलब्धता पाहता झूम व इतर अ‍ॅपद्वारे सुद्धा प्रशिक्षण देण्याची तयारी पालघर पोलिसांनी ठेवलेली आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाकरिता पालघर जिल्ह्यामधील 6 पोलीस अधिकारी व 26 पोलीस कर्मचार्‍यांची निवड करण्यात आली असुन हे अधिकारी-कर्मचारी विद्यार्थांना गुन्ह्यांना प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतुक जागरुकता, भ्रष्टाचार निर्मुलन, संवेदनशिलता, सहानुभुती, महिला व बालकांची सुरक्षितता, समाजाचा विकास, दुष्ट सामाजिक प्रवृत्तीस आळा घालणे, नितीमुल्य, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता इ. विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार असुन समन्वय अधिकार म्हणुन पोलीस कल्याण शाखेतील पोलीस उप निरिक्षक विचारे, पोलीस शिपाई सहाणे, झिणे व गुंजाळ आदी कर्मचारी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता प्रयत्न करीत आहेत.

हा अभ्यासक्रम सुरु करीत असताना विद्यार्थ्यांना शासनातर्फे माझे कुटूंब माझी जबाबदारी याबाबत थोडक्यात माहीती देऊन त्यांना पोलीस अधीक्षक शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments