मनोर, दि. 15 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर पोलीस स्टेशन हद्दीत येणार्या सरमिरा हॉटेलच्या परिसरात पिस्टल विक्रीकरिता आलेल्या 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून दोन पिस्टलसह 8 जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त केली आहेत.
महामार्गावरील हालोली पाडोसपाडा येथील सरमिरा हॉटेलच्या परिसरात 14 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री शस्त्र खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून मध्यरात्री 12.40 वाजेच्या सुमारास सुशांत सुनिल सिनकर (वय 25, रा. दहिसर) या संशयित तरुणाला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे दोन पिस्टल व 9 जिवंत काडतूसे आढळून आली.
दरम्यान, आरोपीला अटक करुन त्याच्याविरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक श्रीकांत कोळी करित आहेत.