मिहीर शहा होणार डहाणूरोड जनता बॅंकेचे नवे अध्यक्ष

0
2435

दि. 14 ऑक्टोबर: डहाणू तालुक्यातील अग्रगण्य सहकारी बॅंक असलेल्या दि डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे नवे अध्यक्ष म्हणून मिहीर शहा यांचे नाव एकमताने पुढे येत आहे. राजेश पारेख यांच्या निधनामुळे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. बॅंकेचे उपाध्यक्ष ॲड. रमेश नहार यांनी देखील 5 महिन्यांपूर्वीच संचालक पदाचा राजीनामा दिलेला असल्यामुळे हे पद देखील रिक्त आहे. वर्षभरात होणाऱ्या बॅंकेच्या निवडणूका लक्षात घेता अध्यक्षपदावर कोण येते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

दि डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेच्या 4 वर्षांपूर्वी दिवंगत राजेश पारेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणूकीत भरत राजपूत यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला होता. या निवडणूकीत माजी नगराध्यक्ष असलेल्या मिहीर शहा यांची भूमिका देखील महत्वाची होती. मात्र निवडणूका पार पडल्यानंतर रमेश नहार यांचे पुत्र डॉ. अमित नहार यांनी रमेश नहार यांच्या अध्यक्षपदासाठी आग्रह धरला होता. हे पॅनल आपल्या करिष्मामुळे निवडून आल्याचा नहार यांचा दावा होता. मात्र त्यांच्या मागणीला यश मिळाले नव्हते. बॅंकींग क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन राजेश पारेख यांची अध्यक्षपदावर निवड झाली होती. नाराजी टाळण्यासाठी रमेश नहार यांना उपाध्यक्ष बनविण्यात आले.

वास्तविक डॉ. अमित नहार निवडणूक लढविण्यास अपात्र ठरल्यामुळे त्यांनी आपले वडील रमेश नहार यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र अमित नहार यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करणे त्यांच्या स्वभावाला जमले नाही. त्यामुळे ते बॅंकेच्या सभांना सातत्याने अनुपस्थित राहू लागले. सर्वसाधारण सभांना देखील ते उपस्थित रहात नसत. त्यांनी 5 महिन्यांपूर्वी रीतसर राजीनामा देखील सादर केला होता. मात्र त्यांना राजीनामा मागे घ्यावा यासाठी आग्रह चालू ठेवून त्यांच्या राजीनाम्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. असे असले तरी ते सलग 5 (3 पेक्षा जास्त) सभांना गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे संचालक पद आता रिक्त समजले जात आहे. तरीही बॅंकेत झालेल्या राजेश पारेख यांच्या शोकसभेच्या वेळी नहार यांनी नव्याने अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त करुन पाहिली. मात्र प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते व्यथित झाल्याचे समजते.

Print Friendly, PDF & Email

comments