डहाणू : पिस्तुलाचा धाक दाखवत 1.10 लाखांची लूट; 4 तासांत आरोपी गजाआड

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील आकाश हॉटेलमधील घटना

0
3431

डहाणू, दि. 1 ऑक्टोबर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबोली येथील हॉटेल आकाशमध्ये बुधवारी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास तीन जणांच्या टोळीने पिस्तुलाचा धाक दाखवत 1 लाख 10 हजार रुपयांची लूट केल्याची थरारक घटना घडली. यावेळी हॉटेलचे कर्मचारी व काही ट्रक चालकांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता हवेत गोळी झाडून आरोपी फरार झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबवून केवळ चार तासांच्या आत आरोपींना गजाआड केले.

या गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी आज पालघर पोलीस अधिक्षक कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल आकाश येथे आज मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास हुंडाई आय-20 या कारमधुन तीन जण जेवण करण्यासाठी आले होते. 2.30 वाजेच्या सुमारास त्यांचे जेवण झाल्यानंतर त्यांच्यापैकी एक जण कारमध्ये जाऊन बसला. तर दोघे जण बिल काऊंटरवर गेले. हॉटेलच्या मॅनेजरला काही कळण्याच्या आतच या दोघांपैकी एकाने आपल्याकडील पिस्तुल काढले व मॅनेजरवर रोखून गल्ल्यातील रक्कम काढून घेतली. रक्कम घेतल्यानंतर आरोपी हॉटेलबाहेर पडताच हॉटेलचा मालक व मॅनेजरने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकुन हॉटेलचे इतर कर्मचारी व आजूबाजुचे ट्रक चालक तेथे जमा झाले व त्यांनी आरोपींना घेरले. त्यांच्या गाडीची चावी देखील काढून घेण्यात आली. त्यामुळे पकडले जाण्याच्या भितीने आरोपींनी आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला व कार तेथेच सोडून घटनास्थळावरुन पळ काढला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस अधिक्षक शिंदे यांनी पालघरचे अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, व डीवायएसपी विकास नाईक, डहाणूचे डीवायएसपी मंदार धर्माधिकारी, बोईसरचे डीवायएसपी विश्वास वळवी यांच्यासह घटनास्थळी पोहोचून पाहणी केली व तात्काळ जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांना आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करणार्‍या व बाहेर जाणार्‍या नाक्यांवर सक्त नाकाबंदीचे आदेश देऊन कोंबिंग ऑपरेशन राबविले. त्याचवेळी घटनास्थळावर आरोपींनी सोडलेल्या कारची माहिती काढली असता आरोपींनी 2/3 दिवसांपुर्वी कार भाड्याने घेतली असल्याचे समोर आले व तेथूनच पोलिसांना आरोपींची ओळख पटवण्यात मदत झाली.

आरोपींची ओळख पटल्यानंतर पुढील तासाभरात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

  • आरोपी परराज्यातील रहिवासी!
    या गुन्ह्याचा सखोल तपास पूर्ण न झाल्याने पोलिसांनी आरोपींची ओळख व त्यांना अटक केलेल्या ठिकाणाचे नाव देण्यास टाळले. मात्र हे आरोपी परराज्यातील असून 19 ते 22 वर्षे वयोगटातील असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
  • उद्या न्यायालयात हजर करणार!
    अटक आरोपींची कसून चौकशी करण्यात येत असुन त्यांना उद्या, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी न्यायालयाकडे आरोपींची पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Print Friendly, PDF & Email

comments