स्नेहवर्धक मंडळाचे अ. ज. म्हात्रे विद्यालय वादाच्या भोवऱ्यात! 3 महिला शिक्षिकांवर अन्याय! एकीला बडतर्फ केले, दोघींची सेवाज्येष्ठता नाकारली आणि चौथ्या क्रमांकाच्या पुरुषाला मुख्याध्यापक केले! सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेला निर्णय फिरवण्याचा प्रयत्न!

0
6737

दि. 22 सप्टेंबर 2020 (संजीव जोशी): डहाणू तालुक्यातील नरपड येथील 75 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेले स्नेहवर्धक मंडळ संस्थाचालकांच्या मनमानीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संस्थेने महिला मुख्याध्यापिका सौ. सुजाता राऊत यांना फुटकळ कारणातून थेट बडतर्फ केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने द्वितीय क्रमांकाच्या सेवाज्येष्ठतेवर शिक्कामोर्तब केलेल्या पर्यवेक्षीका सौ. लता हरेश माळी व तृतीय क्रमांकाची सेवा ज्येष्ठता असलेल्या सौ. माधुरी अनिरुद्ध पाटील ह्या महिला शिक्षिकांना प्रभारी मुख्याध्यापक पदाचा पदभार देताना डावलून पाच क्रमांकाची ज्येष्ठता असलेले शिक्षक चंद्रकांत रमण पारधी यांना पदभार दिला. पारधींच्या कार्यकाळात नवी ज्येष्ठता यादी बनवून 4 क्रमांकाची ज्येष्ठता असलेले शिक्षक शतृघ्न कांबळे यांना 1 क्रमांकाची सेवाज्येष्ठता बहाल करण्यात आली. त्यानंतर पारधींचा प्रभारी मुख्याध्यापक पदाचा कारभार शतृघ्न कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. आता ह्या प्रकाराविरोधात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच असंतोष पसरला असून संस्थेने सेवाज्येष्ठता असलेल्या लता माळी यांना प्रभारी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सुपूर्द करण्याबाबत ठराव करुन चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ह्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याचे पाहून संस्थेच्या कार्यवाहांविरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी चालू असून संस्थेच्या कारभाराची लक्तरे टांगली जात आहेत. संस्थेमध्ये बेबनाव होताना दिसतो आहे.

सर्वप्रथम सौ. सुजाता राऊत यांना मुख्याध्यापक पदावरुन कसे बडतर्फ केले ते पाहू या!

सुजाता राऊत ह्या मुख्याध्यापक पदावर असताना तत्कालीन पर्यवेक्षक शतृघ्न कांबळे यांनी तालुका शिक्षणाधिकाऱ्यांकडे 13 जानेवारी 2018 रोजी मुख्याध्यापक सुजाता यांच्या दुर्लक्षामुळे अ. ज. म्हात्रे विद्यालयात शालेय पोषण आहाराची नासाडी झाल्याची तक्रार केली. ह्या तक्रारीच्या अनुषंगाने 31 जानेवारी 2018 रोजी डहाणूचे गट शिक्षणाधिकारी रावते यांनी शाळेला भेट देऊन 25 क्विंटल तांदूळ व 4 क्विंटल वाटाणा खराब झाल्यामुळे देयकातून 47 हजार 663 रुपयांची नुकसान भरपाई वसूल करावी अशी शिफारस केली. त्यानंतर प्राथमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी 2 जून 2018 रोजीच्या पत्रान्वये सुधारित 39 हजार 738 रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. याच संदर्भात पुन्हा माध्यमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी 5 जुलै 2018 रोजीच्या पत्रान्वये देयकातून 47 हजार 663 रुपयांची नुकसान भरपाई वसूल करावी अशी शिफारस केली. संस्थेने शालेय पोषण आहाराचे कंत्राट बचतगटाला दिले असल्यामुळे व शिक्षणाधिकारी यांनी देयकातून पैसे वसूल करण्याची शिफारस केल्यामुळे संबंधित बचतगटाच्या देयकांतून नुकसान भरपाई वसूल करण्यात आली.

बचतगट संस्थाचालकाच्या पत्नीचा!

स्नेहवर्धक मंडळाला बचतगटाला भुर्दंड लावणे पटले नाही. त्यांनी दिनांक 24 जानेवारीच्या 2019 रोजीच्या सभेत मुख्याध्यापक सुजाता यांना स्वतःच्या खात्यातून 47 हजार 663 रुपयांची नुकसान भरपाई अदा करुन ती संस्थेच्या खात्यात भरावी आणि संस्थेकडून ती बचतगटाला परत करण्यात यावी व सुजाता यांची एक वेतनवाढ रोखून सेवापुस्तिकेत नोंद घेण्यात यावी असा ठराव केला. वास्तविक 26 फेब्रुवारी 2014 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे शालेय पोषण आहारासंदर्भात नुकसानीस मुख्याध्यापकाना जबाबदार न धरता बचतगटाला जबाबदार धरण्याचे तत्व असताना संस्थेच्या लोकांचे बचतगटाशी हितसंबध गुंतलेले असल्याने बचतगटावर कुठलीही कारवाई न करता मुख्याध्यापकाना बळीचा बकरा बनविण्यात आले. सुजाता यांनी संस्थेला विनंत्या करुन पाहिल्या. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर स्वतःच्या खात्यातून नुकसान भरपाई अदा करुन बचतगटाच्या देयकातून कापलेले पैसे परत करण्यात आले.

महिला हरली आणि पुरुष (?) जिंकले!

दरम्यान आजारपणाची दीर्घकालीन रजा भोगत असलेले सह शिक्षक शतृघ्न कांबळे यांच्या दिनांक 11 फेब्रुवारी 2019 रोजीच्या पत्रानंतर माध्यमिकचे तत्कालीन प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी (लाच घेताना शिक्षणाधिकारी पकडले गेल्यामुळे पदाला पात्र नसताना तात्पुरते पदभार मिळालेले) जे. जे. खोत यांनी 21 फेब्रुवारी 2019 रोजी नव्याने अ. ज. म्हात्रे विद्यालयाला पत्र लिहून मुख्याध्यापक सुजाता अंशतः दोषी असल्याचे कळवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. आधीच कारवाई झालेली असताना पुन्हा लगेच 24 फेब्रुवारी 2019 रोजी संस्थेने ठराव करुन सुजाता यांना निलंबित का करु नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली. 26 एप्रिल 2019 रोजी सुजाता यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या चौकशीचे नाटक रंगविण्यात आले. त्यांना बचावासाठी आवश्यक कागदपत्रे देखील उपलब्ध करुन देण्यात आली नाहीत. दरम्यान सुजाता यांनी दिनांक 25 नोव्हेंबर 2019 रोजी बोगस सह्यांच्या आधारावर आपल्या विरोधात खोटा पुरावा तयार केला जात असल्याबाबत डहाणू पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर 23 डिसेंबर 2019 रोजी एकतर्फी चौकशी करुन सुजाता यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यांनी याविरुद्ध सक्षम प्राधिकरणाकडे अपील दाखल केलेले आहे. सुजाता यांचा न्याय तूर्तास लॉक डाऊनमध्ये अडकला आहे.

मुख्याध्यापक पदाचा प्रभारी पदभार सेवाज्येष्ठतेत क्रमांक 5 वरील शिक्षकाकडे दिला

सुजाता यांना 26 एप्रिल 2019 रोजी निलंबित केल्यानंतर संस्थेमध्ये सेवाज्येष्ठता क्रमाने सुजाता यांचेनंतर दुसऱ्या स्थानी असलेल्या पर्यवेक्षीका सौ. लता हरेश माळी यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक पदाचा पदभार देणे अपेक्षीत होते. मात्र संस्थेने लता यांच्यासह 3 क्रमांकाची सेवाज्येष्ठता असलेल्या सौ. माधुरी अनिरुद्ध पाटील या महिलांना डावलून 5 क्रमांकाच्या चंद्रकांत रमण पारधी यांना प्रभारी मुख्याध्यापक बनवले. शिक्षण विभागाने देखील काहीही न तपासता डोळे मिटून मान्यता दिली. त्यांच्या कार्यकाळात सुजाता यांना बडतर्फ करण्यापर्यंत मजल मारण्यात संस्थेला यश आले. त्यावेळी 4 क्रमांकाची सेवाज्येष्ठता असलेले शतृघ्न कांबळे हे तक्रारी व पाठपुरावा करण्यासाठी आजारपणाच्या दीर्घकालीन रजेवर असल्याने त्यांना पदभार देता आला नाही.

सौ. लता माळींची सेवा ज्येष्ठता डावलली

एका महिलेला धडा शिकविण्यात यश आल्यानंतर संस्थेचा आत्मविश्वास जरुरीपेक्षा जास्त वाढला. सेवाज्येष्ठ व पर्यवेक्षक पदावर असलेल्या लता माळी यांना प्रभारी मुख्याध्यापक पद नाही मिळाले तरी त्यांची तक्रार नव्हती. कारण ते औटघटकेचे होते. सुजाता ह्या बडतर्फ होऊ शकतील असे त्यांना वाटले नव्हते. मात्र दरम्यान सुजाता निलंबित असतानाच्या कालावधीत पारधी यांच्याकडे पदभार असताना मे 2019 मध्ये संस्थेने नव्याने सेवाज्येष्ठता यादी बनवली. त्या यादीनुसार स्वतः पारधी यांची सेवाज्येष्ठता क्रमांक 5 वरच राहिली. मात्र शतृघ्न कांबळे यांना क्रमांक 2 वर आणण्यात आले आणि 2 क्रमांकाच्या लता माळी यांना 4 क्रमांकावर नेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन जे स्थान मिळविण्यात कांबळे यांना यश आले नाही, ते स्थान संस्थेचे अध्यक्ष दिव्यनाथ म्हात्रे आणि प्रभारी मुख्याध्यापक पारधी यांनी दिले होते. अर्थात ह्यात पारधी ह्यांचा काहीच लाभ झालेला दिसत नसल्याने ते केवळ मोहरा असल्याचे मानले जाते. 2 जुलै 2019 रोजी लता माळी यांनी सेवाज्येष्ठता यादीवर हरकत नोंदविण्याचा हक्क राखून ठेवत स्वाक्षरी केली होती. शतृघ्न कांबळे यांचा प्रभारी मुख्याध्यापक बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता आणि त्याप्रमाणे घडले देखील. शतृघ्न कांबळे अ. ज. म्हात्रे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक बनले आहेत.

लता माळी यांच्या सेवा ज्येष्ठतेचे प्रकरण काय आहे?

अ. ज. म्हात्रे विद्यालयातील तत्कालीन पर्यवेक्षक 31 मे 2017 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर संस्थेने 1 जून 2017 रोजी शतृघ्न कांबळे यांना पर्यवेक्षक पदावर पदोन्नती दिली. ह्या निर्णयाच्या विरोधात लता यांनी 14 जुलै 2017 रोजी शाळा प्राधिकरण (नवी मुंबई) येथे (अपील क्र. 24/2017) दाद मागितली. प्राधिकरणाने दिनांक 28 मार्च 2018 रोजी लता यांचे अपील मंजूर करुन 1 जून 2017 रोजीचा कांबळे यांच्या पदोन्नतीचा आदेश रद्दबातल केला व संस्थेला लता यांना पर्यवेक्षक पदाची पदोन्नती देण्याचे व तसे शिक्षणाधिकारी कार्यालयाला देखील कळविण्याचे निर्देश दिले.
ह्या निकालाने व्यथित झालेल्या कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेत रिट याचिका (क्र. 5285/2018) दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 18 जून 2018 रोजी याचिका फेटाळली. निकालात न्यायालयाने शाळा प्राधिकरणाचा निकाल उचीत ठरवून सर्वतोपरी लता माळी ह्या शतृघ्न कांबळे यांच्यापेक्षा सेवाज्येष्ठ असल्याचा निष्कर्ष काढला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने व्यथित झालेल्या कांबळे यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील (क्र. 20524/2018) दाखल केले. 17 ऑगस्ट 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत अपील फेटाळून लावले.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच केली तक्रार

23 ऑगस्ट 2020 रोजी संस्थेच्या कार्यकारी मंडळाने लता यांची प्रभारी मुख्याध्यापक पदावर नेमणूक करण्याचा ठराव मंजूर केला. कार्यकारी मंडळ इतकेच करुन थांबले नाही तर 24 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना तसे रीतसर कळवले देखील. ह्या पत्रात संस्थेचे कार्यवाह प्रसाद पाटील यांच्यावर अविश्वास दर्शविण्यात आला आहे. संस्थेचे निर्णय शिक्षण विभागाकडे पाठविले जात नसल्याचे सांगून निर्णय शिक्षण विभागाला कळविण्यात आला. पत्राची दखल घेत जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने 1 सप्टेंबर 2020 रोजी चौकशी सुरु केली. असे असताना संस्थेचे अध्यक्ष लता यांची सेवाज्येष्ठता डावलणारी यादी बनविण्यात दंग होते. कार्यकारिणीला लता यांना मुख्याध्यापक पदावर नेमायचे होते तर अध्यक्ष दिव्यनाथ म्हात्रेना कांबळेना मुख्याध्यापक पदावर नेमायचे होते.

लता माळींची हरकत आणि संस्थेची भूमिका

शतृघ्न कांबळे यांनी प्रभारी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक घडामोडी घडत राहिल्या. तशी 3 सप्टेंबर 2020 रोजी नव्याने सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. त्यात आधीची चूक सुधारली जाईल अशी अपेक्षा असताना पुन्हा लता यांची सेवाज्येष्ठता डावलण्यात आली. लता यांनी 4 सप्टेंबर 2020 रोजी संस्थेला सविस्तर पत्र लिहून हरकत नोंदवली. लगेचच 10 सप्टेंबर 2020 संस्थेचे अध्यक्ष दिव्यनाथ म्हात्रे भले मोठे पत्र देऊन त्यांच्यामागे देखील चौकशी व कारवाईचा ससेमिरा सुरु केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील देण्यात आली. गंभीर बाब असल्याचे नमूद करून त्यांना प्रभारी मुख्याध्यापक कांबळे यांनी 2 दिवसांत खूलासा करण्याचे फर्मान काढले.

आजारपणाच्या दीर्घकालीन रजेवर जाऊन मुख्याध्यापिका सुजातांच्या शिक्षण विभागात तक्रारी करणारे व लता यांच्याविरुद्ध सेवाज्येष्ठतेसाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागून अयशस्वी ठरल्यानंतरही आज स्थितीत मुख्याध्यापक पद उपभोगण्यात यशस्वी ठरलेले शतृघ्न कांबळे हे बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसद ह्या संस्थेचे जिल्हाध्यक्ष आहेत. ह्या पदाचा वापर करुन कांबळे यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. कांबळे ह्यांच्या विरोधात 3 मार्च 2011 रोजी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये संस्थेच्याच सेवेतील एका सह शिक्षिकेने विनयभंगाचा गुन्हा (दाखल क्र. 22/2011) दाखल केल्यानंतर स्नेहवर्धक मंडळाच्या व्यवस्थापक मंडळाने दिनांक 10 एप्रिल 2011 रोजी कांबळे यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता.

कांबळे यांनी 2 फेब्रुवारी 2018 रोजी शिक्षण विभागाकडे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची तक्रार केली होती. तक्रारीची प्रभारी गट विकास अधिकारी तथा चौकशी अधिकारी एम. पी. पवार, गटशिक्षणाधिकारी व्ही. एम. रावते व चिखले केंद्रप्रमुख दिलीप जोंधळेकर ह्यांच्या समितीने चौकशी केली होती. दिनांक 21 मे 2018 रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना पाठविलेल्या चौकशी अहवालात ” कांबळे हे नाहक तक्रारी करीत असतात ” असा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. कांबळे यांनी दीर्घकालीन रजेवर जाताना सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर देखील संस्थेतर्फे शंका व्यक्त केली होती. मात्र फुटकळ कारणाने सुजाता यांना बडतर्फ करुन, लता यांना चौकशी समित्यांच्या फेऱ्यात अडकवण्याच्या धमक्या देणाऱ्या स्नेहवर्धकचे अध्यक्ष दिव्यनाथ यांनी कांबळेंना मात्र अभय दिलेले दिसते आहे.

संस्थेचे अध्यक्ष दिव्यनाथ म्हात्रे काय म्हणतात?

तत्कालीन मुख्याध्यापक सुजाता राऊत, पर्यवेक्षीका लता माळी व लिपिक वाल्मिकी प्रधान यांनी संगनमताने सेवाज्येष्ठता यादीत फेरफार करुन तत्कालीन शाळा समितीच्या अध्यक्षांच्या भोळे पणाचा फायदा घेऊन त्यावर अध्यक्षांची सही घेतली आहे.
लता माळी यांची सेवाज्येष्ठता 24 जानेवारी 2017 व 14 नोव्हेंबर 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार शाळा प्राधिकरणाकडे टिकली. हे दोन्ही शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र. 14242/2018 मधील निर्देशानुसार 3 मे 2019 च्या शासन निर्णयाने रद्द झाले आहेत. त्यामुळे लता माळी यांची सेवाज्येष्ठता देखील रद्द झाली आहे. (प्रत्यक्षात शाळा प्राधिकरणाकडील अपील क्र. 24/2017 वरील दिनांक 28 मार्च 2018 रोजीच्या न्यायनिवाड्यात 24 जानेवारी 2017 किंवा 14 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयाचा कुठेही आधार घेतलेला दिसत नाही.)

Print Friendly, PDF & Email

comments