कंत्राटी क्रीडा शिक्षकांना आदिवासी विकास विभागाने सोडले वाऱ्यावर

0
1027

पालघर, 14 सप्टेंबर: लॉक डाऊनच्या काळात खासगी आस्थापनांनी कामगार/कर्मचाऱ्यांचे पगार द्यावेत अशी सरकारची भूमिका असताना आदिवासी विकास विभागाने मात्र कंत्राटी क्रीडा शिक्षकांचे वेतन रोखून धरले असून नव्याने कंत्राटी नियुक्ती देण्यासाठी टाळाटाळ चालवलेली आहे. राज्यातील 505 क्रीडा शिक्षकांनी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे दाद मागितली असली तरी सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक प्रकल्प कार्यालयांमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांसाठी 505 क्रीडा शिक्षकांशी 2018 ते 2021 अशा सलग 3 शैक्षणिक वर्षांसाठी दरवर्षी 11 महिन्याच्या कंत्राटी सेवेचे करार झाले होते. करार कालावधीत अन्यत्र नोकरी करता येणार नाही असे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र त्यांच्याकडून करुन घेतले आहे. सर्व शिक्षकांनी 2 शैक्षणिक वर्षांसाठी सेवा दिली आहे. करार केल्यामुळे सर्व शिक्षकांनी अन्यत्र संधी न शोधता 2020-21 शैक्षणिक वर्षाच्या नियुक्तीची वाट पाहिली. मात्र शैक्षणिक वर्ष सुरु होऊन 3 महिने लोटले असले तरी त्यांना 11 महिन्याच्या नियुक्तीचे पत्र प्राप्त झालेले नाही. मागील वर्षीचे मार्च व एप्रिल महिन्यांचे मानधन देखील न मिळाल्यामुळे क्रीडा शिक्षकांवर हलाखीची परिस्थिती ओढवली आहे. ह्यातून लवकरात लवकर तोडगा निघावा अशी क्रीडा शिक्षकांची मागणी आहे.

Print Friendly, PDF & Email

comments