बोईसर, दि. 13: दैनिक सकाळचे पत्रकार मनोज कृष्णकुमार पंडित (53) यांचे आज वसई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक विवाहित मुलगी व जावई असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून कोरोनावर मात करुन ते परतले. मात्र घरी परतताच त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर वसईतील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेत असताना त्यांच्यावर आज सकाळी 10.30 वाजता काळाने झडप घातली.
मनोज पंडित हे साहित्य व कलाप्रेमी होते. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या बोईसर तारापूर शाखेचे उपाध्यक्ष होते. ही शाखा स्थापन करण्यात त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांनी पक्षी निरीक्षण करण्याचा छंद देखील जोपासला होता व पक्षी निरीक्षणासाठी ते अनेक ठिकाणी भेटी देत असत. स्थलांतरित पक्षांबाबतचे त्यांचे वृत्तांकन व छायाचित्रण विशेष वाखाणण्याजोगे असे. त्यांचा अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग होता. काही काळ त्यांनी दैनिक राजतंत्र व आकाशवाणीसाठी देखील वार्तांकन केले.