इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे राज्य सरकार विरुद्ध लढा! डहाणू शाखा देखील आंदोलनात सहभागी!

0
1247

डहाणू दि. 12 सप्टेंबर 2020: सध्या महाराष्ट्रात राज्यभर इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) तर्फे सरकार विरुद्ध एक लढा चालला आहे. ह्या विषयी आय.एम.ए.च्या डहाणू शाखेचे अध्यक्ष डॉ. शागिर अत्तार व सरचिटणीस डॉ. ज्योती बापट यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. प्रसिद्धी पत्रकातील आशय असा आहे:-

सध्या कोरोना महामारीने भारतात अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. देशात सर्वाधिक रूग्ण संख्या महाराष्ट्रात आहे तसेच महाराष्ट्राचा मृत्युदर देखील चिंताजनक आहे. या महामारीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सर्व स्तरांवर होत आहेत. सरकारी अधिकारी, पोलीस दल, आणि वैद्यकीय कर्मचारी आपले प्राण पणाला लावून या साथीचा मुकाबला करीत आहेत. यात सरकारी आणि खाजगी डॉक्टरांचा सिंहाचा वाटा आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन किंवा आय.एम. ए. ही ॲलोपॅथी डॉक्टरांची संघटना आहे. संघटनेच्या भारतभर शाखा आहेत. आरोग्यविषयक मुद्यांवर सरकारला मार्गदर्शन करण्याचे कामही ही संस्था करत असते.

महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण सापडण्याच्या कितीतरी आधी, म्हणजे 4 फेब्रवारी 2020 रोजी राज्य आय.एम.ए. ने मा. मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून, साथीचा सामना करण्यासाठी गरज भासल्यास आमच्या संघटनेकडून सर्वतोपरी मदत केली जाईल हे जाहीर केले होते.

वेळोवेळी पत्र लिहून पी.पी.ई. किट्स, मास्क, सॅनिटायझर इत्यादी वस्तूंच्या संभाव्य आवश्यकतेबद्दल आय.एम.ए. ने सरकारला मार्गदर्शन केले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी संघटनेने सरकारला सर्वतोपरी सहाय्य केले आहे.

मात्र आज अतिशय खेदाने नमूद करावेसे वाटते की आमची हीच आय.एम.ए. संघटना आज सरकारशी संघर्ष करण्याची भूमिका घेत आहे, नव्हे तर तसे करण्यास संघटनेस भाग पाडण्यात आले आहे! असे काय घडले की ज्यामुळे आम्हा डॉक्टरांना ही टोकाची भूमिका घ्यावी लागली?

 • सहकार्य आणि समन्वय साधण्याची आम्ही पराकाष्ठा करूनही सरकारने कुठल्याही निर्णयाबद्दल आम्हाला विश्वासात न घेता अनेक निर्णय एकतर्फी पद्धतीने घेतले. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या सुचनांना केराची टोपली दाखवली.
 • प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री यांनी खाजगी डॉक्टरांना नोटिसा पाठवल्या. सगळे दवाखाने चालू ठेवलेच पाहिजेत नाहीतर गुन्हेगारी खटला चालवू, रुग्णाचे बिल कमी करा नाहीतर डॉक्टरांची नोंदणी रद्द करू अश्या धमक्या देण्यात आल्या. खरं तर काही वयस्कर व व्याधीग्रस्त डॉक्टर्स वगळता इतर साऱ्याच डॉक्टरांनी कायमच आपले दवाखाने सुरू ठेवले आहेत. यासाठी सारखी धमकीवजा पत्रके काढण्याचा सपाटा लावण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. यामुळे अनेक डॉक्टरांच्या मनात अपमानाची भावना निर्माण झाली.
 • मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि अनेक नेतेमंडळी यांनी “ डॉक्टर्स लूट करतात ” असा अपप्रचार करून आमची बदनामी केली. साथीच्या नियंत्रणात सरकार स्वतः विफल ठरू नये म्हणून डॉक्टरांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला व लोकांची दिशाभूल केली. अर्थात जेव्हा कुणी मंत्री किंवा बडे नेते कोरोनाग्रस्त झाले तेव्हा त्यांनी याच तथाकथित लुटारू डॉक्टरांच्या तथाकथित गल्लाभरू दवाखान्यांचाच आसरा घेतला. आणि त्यावेळी जनतेतील कुणी त्यांना जाबही विचारला नाही की आम्हा साधारण जनतेसाठी सरकारने चालविलेल्या रुग्णालयांवर सरकारच्या नेत्यांचा भरवसा नाही का?
 • कुठलाही अधिकार नसताना सरकारने खाजगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर एकतर्फी पद्धतीने निश्चित केले. असे करणे हे खाजगी रुग्णालयांच्या स्वतःचे दर निश्चित करण्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे असे आय.एम.ए. मानते. हे अव्यवहार्य दर 31 ऑगस्ट 2020 पर्यंत असतील असे आधी जाहीर केले आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकतर्फी पद्धतीने परिपत्रक काढून या पुढेही चालू ठेवले. यासाठीही आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही.
 • कोरोनाचा रुग्ण केवळ कोविड डॉक्टरकडेच जातो असे नाही तर तो सर्वसाधारण खाजगी डॉक्टर्सकडे देखील जातो. त्यांनाही या विषाणूची बाधा होते. विषाणू खाजगी डॉक्टर आणि सरकारी डॉक्टर असा भेदभाव करीत नाही. पण सरकारने सरकारी सेवेतील डॉक्टरांना कोविड इन्शुरन्स कवच दिले आणि खाजगी डॉक्टरांना वाऱ्यावर सोडले. यासंदर्भात दिलेले आश्वासनही सरकारने पाळले नाही. दीडशेपेक्षा जास्त डॉक्टर या साथीचे बळी ठरले आहेत. त्यांना ही लागण रुग्ण तपासतानाच झाली आहे. सरकारने सगळ्या खाजगी व्यावसायिकांना रुग्ण पाहण्याची जबरदस्ती केली, मात्र त्यांना यामुळे कोरोना संसर्ग झाल्यावर सरकारने आपले हात वर केले. ही राज्य सरकारची बेपर्वाईच नाही का?
 • उपचाराचा खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी पीपीई किट्स, मास्क आदींच्या किमतीवर नियंत्रण आणावे असा सल्ला आय.एम.ए. ने सरकारला देऊनही तो मानण्यात आलेला नाही. खर्चिक सामुग्री स्वतःच विकत घेऊन रुग्णसेवेचे व्रत खाजगी डॉक्टर पार पाडत आहेत. पण त्यामुळे नियंत्रित केलेले दर डॉक्टरना परवडेनासे झाले आहेत.
 • महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डॉक्टरना हिंसक हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. पोलिसांनी त्यावर कारवाई करताना अक्षम्य दिरंगाई केली आहे. याबद्दल देखील सरकार मूग गिळून बसले आहे. उलट नेतेमंडळींकडून अनेक डॉक्टरना अपमानास्पद वागणूक मिळते आहे. यामुळे आम्हा सेवाभावी डॉक्टर्सना सतत भीतीच्या सावटाखाली रहावे लागत आहे.

गेले अनेक दिवस या कोरोनाशी दोन हात करत असताना होणारी अवहेलना, अपमान आणि कुचंबणा आम्ही डॉक्टर्स सहन करीत आहोत. कोविड वॊरीयर्स हे शब्द फक्त दिखावा आहे हे दिसतच आहे. तरीही आम्ही घेतलेले रुग्णसेवेचे व्रत आमची सहनशक्ती वाढवण्यास कामी आले आहे. परंतु सहनशक्तीचीही एक मर्यादा असते. आता आमच्या संयमाचा कडेलोट झाला असून संघर्षाशिवाय दुसरा पर्याय सरकारने आम्हाला शिल्लक ठेवलेला नाही.

आमचे हे आंदोलन 7 सप्टेंबर पासून महाराष्ट्रभर सुरू करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन करून आमच्या प्रश्नांबद्द्ल लोकजागृती करण्यात येणार आहे.
आंदोलनाच्या पाहिल्या टप्प्यात,

 • कोविड रुग्णांची सेवा करताना प्राणास मुकलेल्या आमच्या दीडशेहून अधिक डॉक्टर सहकार्यांना मूक श्रद्धांजली वाहण्यात येईल.
 • तसेच आय.एम.ए. च्या सर्व शाखा आपापल्या भागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निवेदने देतील व अन्यायाला वाचा फोडतील.
 • आपापल्या भागातील प्रभावशाली नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडण्यात येईल.
 • डॉक्टरांवर होणारी दडपशाही आणि अपमानास्पद वागणूक याबद्दल त्यांना अवगत करण्यात येईल.
 • मुंबई येथे आझाद मैदानावर महारॅली काढून जनतेचेेही याकडे लक्ष वेधण्यात येईल.
 • सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनाच्या पुढील टप्प्यात आपल्या राजिस्ट्रेशनची होळी करणे, तसेच डॉक्टरांनी मोठ्या संख्येने स्वतःला सेल्फ क्वारान्टीन करणे असे निषेधाचे अधिक प्रभावी मार्ग वापरण्याची रूपरेषा आखण्यात आली आहे.

आम्हाला आशा आहे की या सनदशीर आंदोलनाला चांगला लोकप्रतिसाद मिळेल. तसेच सरकारच्या आणि समाजाच्या वर्तणुकीत यामुळे काही सकारात्मक बदल होईल.
आपण सारे सावध आणि सुरक्षित रहाल अशी सदिच्छा आम्ही आय.एम.ए. संघटनेतर्फे व्यक्त करतो.

जयहिंद – जय महाराष्ट्र
डॉ. शागिर अत्तार, अध्यक्ष – आय. एम. ए. डहाणू
डॉ. ज्योती बापट, सरचिटणीस – आय. एम. ए. डहाणू

Print Friendly, PDF & Email

comments