बोईसर व पालघर औद्योगिक वसाहतींतील सर्व कर्मचार्‍यांची रॅपिड अँटीजन टेस्ट होणार

0
2602

पालघर, दि. 11 : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून पालघर नगर परिषद व बोईसर औद्योगिक क्षेत्रात (एमआयडीसी) कोरोना विषाणूचा प्रसार जास्त होत आहे. त्यामुळे सर्व औद्योगिक वसाहतींमधील कर्मचार्‍यांची 25 सप्टेंबर पर्यंत रॅपिड एंटीजन टेस्ट कुठल्याही परिस्थितीत करून घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी आज दिल्या.

औद्योगिक क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांनी तारापूर एमआयडीसी व पालघरमधील औद्योगिक वसाहतींच्या व्यवस्थापकांची आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत विराज प्रोफाइल, आरती ड्रग्स, लुपिन फार्मा, निऑन लॅबरोटरीज, टाटा स्टील व इतर औद्योगिक वसाहती सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक कर्मचार्‍याची रॅपिड एंटीजन टेस्ट केल्यास ज्या कर्मचार्‍यांमध्ये लक्षणे नाहीत परंतु ते पॉझिटिव्ह आहेत, असे रुग्ण समोर येऊन कारखान्यांमधील व कारखान्यात बाहेरील कोरोनाचा संसर्ग थांबण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे दर दहा दिवसांनी औद्योगिक वसाहतीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. तसेच सर्व औद्योगिक वसाहतींकडे स्वतःची स्वतंत्र अशी सुविधा असणे आवश्यक असून शंभर कर्मचार्‍यांमागे दोन टक्के बेड असलेले डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) निर्माण करावे अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केल्या. यावेळी उपस्थित असलेल्या प्रतिनिधींकडून आपापल्या कर्मचार्‍यांची संख्या, कोव्हिडसाठी केलेल्या सुविधा व कर्मचार्‍यांची केलेली चाचणी याबद्दल जिल्हाधिकार्‍यांकडून सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, तहसिलदार चंद्रसेन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments