दि. 11 सप्टेंबर: गुटख्याच्या छापेमारीत वादग्रस्त ठरलेल्या कासा पोलिस स्टेशनच्या प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. कासा पोलीसांनी संशयास्पद रसायनांची वाहतूक करणारा अपघातग्रस्त टॅन्कर अपघातस्थळावरुन पोलीस स्टेशनला न आणता परस्पर ताब्यात दिल्याचे समोर आले आहे. टॅन्कर मधील घातक रसायन परिसरातील शेतीमध्ये पसरल्यामुळे उभी पीके करपून गेली आहेत. हताश झालेल्या लोकांनी दुसऱ्या दिवशी विविध शासकीय कार्यालयाना तक्रारी केल्या व पोलिसांकडे देखील फौजदारी कारवाईची मागणी केल्यानंतर कासा पोलीस जागे झाले असले तरी टॅन्कर मधील रसायन कुठले होते हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी आदिवासी शेतकऱ्यांची मागणी आहे.
काय आहे घटना?
21 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 च्या सुमारास तारापूर औद्योगिक वसाहतीतून गुजरात राज्यात घातक रसायनमिश्रित सांडपाणी वाहून नेणाऱ्या एम एच 43 यु 9643 क्रमांकाच्या टॅन्करला कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोडगाव येथे अपघात झाला होता. त्यातून सांडणाऱ्या घातक रसायनमिश्रीत पाण्यामुळे परिसरातील गोरगरीब आदिवासींच्या भातशेतांचे नुकसान झाले होते. घातक रसायनमिश्रीत सांडपाण्याची बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होणे शक्य होते. मात्र कासा पोलिसांनी साधा अपघातदेखील दाखल न करता व प्रदूषण नियंत्रण मंडळाला न कळवता टॅन्कर जागेवरुन हलवला आणि पोलिस स्टेशनला न आणता एका धाब्यावर नेवून ठेवला.
पोलिसांच्या भूमिकेवर संशय आल्याने ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी (22 ऑगस्ट) तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, उधवा व मोडगांव ग्रामपंचायत, तालुका कृषी अधिकारी व कासा पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला. मग किमान अपघाताची नोंद घेतली नाही तर अंगाशी येईल हे लक्षात आल्यावर कासा पोलीसांनी तिसऱ्या दिवशी (23 ऑगस्ट) सायंकाळी 7.44 वाजता अपघाताची नोंद घेतली. अपघात घडला तेव्हा टॅन्करच्या चालकाकडे कुठलीही कागदपत्रे नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून बनावट कागदपत्रे तयार केल्यानंतरच त्या आधारावर पोलिसांनी विलंबाने खबर नोंदविल्याचा आरोप आहे.

पोलिसांचा बिन तारखेचा टेबलवर बनवलेला पंचनामा:
प्रत्यक्ष घटनास्थळावर पंचनामा करणे आवश्यक असताना केवळ टॅन्करच्या अपघाती विम्यासाठी मॅनेज पंचनामा केला आहे. पंचनाम्यावर तारीख टाकलेली नाही. घटनास्थळी टॅन्कर कलंडलेला दिसत असताना पंचनाम्यात मात्र तशी नोंद नाही. विशेष म्हणजे पंचनाम्यामध्ये घातक रसायन किती दूरपर्यंत पसरलेले आहे व त्यामुळे झालेले भातशेतीचे नुकसान याबाबत उल्लेख नाही. टॅन्कर मध्ये टायर ऑईल (वापरलेल्या टायरचे विघटन करताना उत्पादित झालेले तेल. हे तेल काही मशिन्समध्ये डीझेलला पर्याय म्हणून वापरले जाते.) असल्याचा उल्लेख पंचनाम्यामध्ये आहे.
स्थानिकांचे काय म्हणणे आहे?
स्थानिक नागरिकांच्यामते मुंबई अहमदाबाद महामार्ग उपलब्ध असताना क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहतूक करणारी व काळे धंदे करणारी वाहने पोलिसांच्या संगनमताने दापचरीचा तपासणी नाका टाळण्यासाठी धुंदलवाडी व उधवा मधून जाणाऱ्या चोरट्या मार्गाने राज्याची सीमा ओलांडतात. अशा अवजड वाहनांची वाहतूक रस्त्यालगतच्या उधवा/मोडगाव अशा गावांसाठी डोकेदुखी ठरत आहे. काही संघटीत टोळ्या त्यासाठी पैसे वसूल करुन संरक्षण देत असतात. येथून अवजड वाहनांची धोकादायक वाहतूक होऊ नये यासाठी सर्वसामान्याने केलेल्या अर्जांना केराची टोपली दाखवली जात आहे.