वाड्यात 65 वर्षीय वृद्धेची हत्या; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
1006

वाडा, दि. 10 : तालुक्यातील सापने (बु) गावात राहणार्‍या रखमाई धर्मा गवते या 65 वर्षीय वृद्ध महिलेची अज्ञात कारणावरुन हत्या केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी रखमाई गवते यांच्या शेजारी राहणार्‍या लहु काळु खाने या 45 वर्षीय इसमाला पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे.

सापने (बु) गावातील कादिवली गावाच्या हद्दीत असलेल्या करंज डोंगरीत वनविभागाचा प्लॉट आहे. या प्लॉटला लागूनच रखमाई गवते यांची शेतजमीन आहे. तर त्यांच्या शेजारी लहु खाने याची शेतजमीन आहे. रखमाई गवते या शेतीकाम करण्यासाठी दररोज शेतात जात असत व दुपारच्या सुमारास जेवण करण्यासाठी घरी परतत असत. मंगळवार, 8 सप्टेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे त्या शेतात गेल्या मात्र दुपारच्या सुमारास जेवणासाठी परतल्याच नाही. त्यामुळे त्यांची नात त्यांना बघण्यासाठी शेताच्या दिशेने जात असताना वाटेतच लहु खाने तिला दिसला. यावेळी तिने त्याच्याकडे रखमाईंबाबत विचारपूस केली असता त्याने काहीही सांगितले नाही. त्यामुळे नातेने काही वेळ शेताच्या परिसरात रखमाईंचा शोध घेतला. मात्र त्या दिसल्या नाही. अखेर 4 वाजता लहु खाने यानेच गवत टाकून लपवलेला रखमाईंचा मृतदेह तिच्या निदर्शनास आणून दिला.

या घटनेची माहिती वाडा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता रखमाईंच्या कपाळावर, डोक्यावर व मानेवर कोणत्यातरी हत्याराने वार करुन त्यांची निर्घूण हत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यात संशयित असलेल्या लहु खानेवर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302 व 201 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला व दुसर्‍या दिवशी (9 सप्टेंबर) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments