जळगाव कारागृहातुन फरार झालेल्या आरोपीला बोईसरमध्ये अटक

0
1930

बोईसर, दि. 6 : जळगाव जिल्हा कारागृहातील जेल गार्डला पिस्तुलीचा धाक दाखवून फरार झालेल्या गौरव विजय पाटील नामक आरोपीला बोईसरमधून अटक करण्यात आली आहे. या आरोपीवर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 307 (खूनाचा प्रयत्न करणे) सह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावमधील जिल्हा पेठ पोलिसांनी गौरव पाटीलला भारतीय दंड विधान संहितेचे कलम 307, 120, 201, 353, 224, 225 सह आर्म अ‍ॅक्ट 3 व 25 नुसार अटक केली होती. यानंतर त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. काही दिवसांपुर्वीच गौरव पाटील व त्याच्या दोन साथिदारांनी कारागृहाच्या जेल गार्डला पिस्तुलीचा धाक दाखवून कारागृहातून पळ काढला होता. या घटनेनंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनतर्फे प्रसिद्धी पत्रक काढून या आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, गौरव पाटील हा आरोपी बोईसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याची गुप्त माहिती बोईसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बोईसर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेऊन सापळा रचून त्याला अटक केली.

आरोपी गौरव पाटीलला आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन जळगाव पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक व त्यांच्या स्टाफच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई…
बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एस. पाटील, पोलीस हवालदार विनायक मर्दे, पोलीस शिपाई अशपाक जमादार, वैभव जामदार, संतोष वाघचौरे व देवा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Print Friendly, PDF & Email

comments