मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय अस्तीत्वात आले! सदानंद दाते पहिले पोलीस आयुक्त! ठाणे ग्रामीण व पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांचे कार्यक्षेत्र घटले! क्रीम पोलीस स्टेशन्सची संख्या घटली!

0
1110

पालघर, दि. 3: ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर महापालिका क्षेत्र व वसई विरार महापालिका क्षेत्रासाठी नवे पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आले असून सदानंद दाते हे पहिले आयुक्त असणार आहेत. एस. जयकुमार यांची अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. दाते यापूर्वी केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते तर मुंबई पोलीस आयुक्तालयातील सशस्त्र दलाचे अप्पर पोलीस आयुक्त होते.

मिरा भाईंदर व वसई विरार महापालिका क्षेत्रांमध्ये वाढते शहरीकरण व गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता देवेंद्र फडणवीस सरकारने जुलै 2019 मध्ये नव्या पोलीस अयुक्तालयाचा प्रस्ताव मंजूर केला होता. नव्या आयुक्तालयामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आस्थापनेतील मिरा रोड, काशिमिरा, नया नगर, नवघर, भाईंदर आणि उत्तन ही पोलीस ठाणी व पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आस्थापनेतील वसई, विरार, नालासोपारा, माणिकपूर, वालीव, अर्नाळा व तुळींज ही पोलीस ठाणी समाविष्ट असणार आहेत. ह्या पोलीस ठाण्यांची फेररचना करुन काशिगाव, खारिगाव, पेल्हार, आचोला, मांडवी, बोळींज आणि नायगांव अशी नवी पोलीस ठाणी अस्तित्वात येणार आहेत.

नव्या आयुक्तालयात अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचा आयुक्त, 3 पोलीस आयुक्त (पोलीस अधिक्षक दर्जाचे) व 13 सहाय्यक आयुक्त (डिवायएसपी दर्जाचे) अधिकारी असणार आहेत. एकूण 4,708 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ मंजूर करण्यात आले असून त्यासाठी ठाणे ग्रामीण मधून 1,006 व पालघर जिल्ह्यातून 1,135 पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यातले क्रीम गेले!
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील सर्व पोलीस ठाणी क्रीम पोलीस ठाणी मानली जातात. त्या पोलीस ठाण्यांसाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा असते. सर्वाधिक गुन्हे देखील वसई महापालिका क्षेत्रातच घडत असतात. आता हे सर्व क्रीम नव्या आयुक्तालयाकडे गेले आहे. पालघर जिल्ह्यात आता बोईसर, तलासरी, कासा व मनोर ही क्रीम पोलीस ठाणी उरलेली आहेत. त्यातील तलासरी पोलीस स्टेशनचे प्रभारी हे पोलीस निरीक्षक तर अन्य 3 ठाण्यांचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक असतात. असे असले तरी बोईसर पोलीस ठाण्याचा व्याप लक्षात घेता तेथे पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमला जात आहे. स्पर्धा लक्षात घेता कासा व मनोर येथे देखील पोलीस निरीक्षक प्रभारी नेमले जाण्याची शक्यता आहे. तूर्त ह्या पोलीस ठाण्यांचे प्रभारी अनुक्रमे सिद्धवा जायभाये व प्रताप दराडे हे असून त्यांना सातत्याने क्रीम पोस्टींग मिळविण्यात यश मिळालेले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी महामार्गावर आपली पकड मजबूत ठेवलेली असून गुटखा माफियांवर दहशत बसवलेली आहे. त्यांनी संयुक्तपणे एका एके 47 विक्रेत्याला जेरबंद केल्यानंतर दबदबा आणखीनच वाढला होता. ह्या 2 अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्यानंतरच अन्य अधिकाऱ्यांना येथे संधी मिळू शकणार आहे.

Print Friendly, PDF & Email

comments