करमतारा इंजिनिअरिंगच्या मालकांवर फौजदारी कारवाई होणार! – औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची ग्वाही …. कामगार उपायुक्त किशोर दहिफळकरांची भूमिका मात्र संशयास्पद!

बोईसरस्थीत करमतारा इंजिनिअरिंग प्रा. लि. कारखान्यात अकबर जलाद सय्यद ह्या 19 वर्षीय कंत्राटी कामगाराचा हात मशिनमध्ये अडकल्याने झालेल्या अपघातात उजव्या हाताची 5 बोटे निकामी झाल्याप्रकरणी कारखान्याच्या मालकांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली असून फौजदारी कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती देण्यात आली आहे. 20 मे रोजी हा अपघात झाल्यानंतर अकबरला केवळ 5 हजार रुपयांची नुकसानभरपाई देऊन त्याची बोळवण करण्यात आली होती. तब्बल 3 महिन्यानंतर आता अकबरला नुकसानभरपाई देखील मिळणार आहे.

वडिलांचे निधन झाल्यामुळे विधवा आईसह झोपडीत रहाणाऱ्या अकबरला पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. तो कंत्राटी कामगार म्हणून करमतारामध्ये जाऊ लागला. अकबर अकुशल कामगार असताना त्याला मशिन हाताळण्याचे काम देण्यात आले. आणि काम करताना त्याच्या उजव्या हाताची 5 बोटे कापली गेली. अकबरला प्रथम बोईसरच्या तृंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व त्यानंतर त्याच्यावर तृंगाच्या अन्य शाखेत शस्त्रक्रिया करण्यात आली. अकबरचे साधे बॅन्केत खाते देखील नाही. ह्या अपघाताबाबत करमतारा उद्योग अथवा तृंगा रुग्णालय प्रशासनाने खबर दिली नसल्याची माहिती बोईसरचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी दिली आहे.

करमतारा व्यवस्थापनाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाला वेळेत अपघाताची खबर न दिल्याचा आरोप होत असला तरी ह्या विभागाचे अधिकारी पाटील यांनी वेळेत खबर प्राप्त झाल्याचे कन्फर्म केले आहे. 20 मे 2020 रोजी अपघात घडलेला असला तरी पाटील अपघाताची चौकशी करण्यासाठी 1 महिन्यानंतर 22 जून रोजी कारखान्यात पोहोचले होते. कोव्हीड च्या आपत्तीमुळे ते त्वरीत चौकशी करु शकले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मशिनला सेफ्टी गार्ड नसल्यामुळे व व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पाटील यांनी काढला आहे.

प्रस्तुत प्रकरणी कामगार उपायुक्त किशोर दहिफळकरांची भूमिका मात्र संशयास्पद दिसून आली आहे. करमतारा इंजिनिअरिंगच्या कारखान्याने व कामगार पुरवणाऱ्या कंत्राटदाराने अकुशल कामगाराकडून कुशल काम करुन घेण्याचा बेजबाबदारपणा दाखवला असताना दहिफळकर यांनी हस्तक्षेप किंवा कुठलीही चौकशी केली नाही. कोरोना साथरोगामुळे कुठल्याही प्रकारची चौकशी केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कंपनी व्यवस्थापनाला कार्यालयात बोलावून योग्य त्या सूचना दिल्याचा त्यांचा दावा आहे. पिडीत अकबर कुठल्या कंत्राटदारामार्फत कारखान्यात काम करीत होता व संबंधित कंत्राटदाराने परवान्याच्या अटीशर्तींचा भंग केला आहे का? ह्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी कामगार कंपनीच्या आस्थापनेवर होता असे सांगून संबंधित कंत्राटदाराचे नाव सांगण्यास मात्र नकार दिला. संबंधित कंत्राटदाराचे नाव समजून घ्यायचे असल्यास माहितीच्या अधिकारात अर्ज करा असा अनाहुत सल्ला देखील दहिफळकर यांनी दिला. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी व करमतारा व्यवस्थापनातर्फे अकबर हा कंत्राटी कामगार असल्याचे स्पष्ट केले जात असताना दहिफळकरांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. ह्यासंबंधात अकबरकडून तक्रार करण्यात आल्यास चौकशी करु असे दहिफळकरांचे म्हणणे आहे. असे म्हणणे मांडताना, अकबर तक्रार करणारच नाही असा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसतो आहे.

कोव्हीडमुळे नुकसानभरपाईस विलंब कि बहाणे?
‘ वर्कमेन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट ‘ ह्या कायद्याप्रमाणे पिडीत कामगाराला 1 महिन्याच्या आत नुकसान भरपाई देण्यात आली पाहिजे. आधीच अंशतः नुकसानभरपाई दिली गेल्यास उर्वरीत रक्कम कामगार आयुक्तांकडे जमा केली पाहिजे. असे असताना करमतारा उद्योगसमुहाकडून कामगाराला अजूनपर्यंत 1 रुपयाची देखील मदत करण्यात आली नसून नुकसानभरपाईची रक्कम कामगार आयुक्तांकडे जमा करण्यात आलेली नाही. कोव्हीड साथरोगामुळे ही रक्कम जमा करता आलेली नसल्याचा त्यांचा दावा आहे. कामगार उपायुक्तांनी देखील कोव्हीड साथरोगामुळे कुठलीही चौकशी केली नाही. ह्यातून कोव्हीड साथरोगाच्या आपत्तीचा बहाणे काढण्यासाठी वापर केला जात असल्याचे अधोरेखीत होत आहे. लॉकडाऊनमुळे अकबर संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचू शकला नाही हे कारण असेल का? अकबर नजरकैदेत तर नाही ना? अकबरवर कुठलेही दडपण नाही ना? तो दबावाखाली नाही ना? ह्या प्रश्नांची उत्तरे अकबरचा पोलीसांनी जबाब घेतल्याशिवाय स्पष्ट होणारी नाहीत.

Print Friendly, PDF & Email

comments