कोरोना : बोईसरकरांसाठी मागील आठवडाभराची आकडेवारी दिलासादायक

0
682

बोईसर, दि. 31 : मागील दोन ते अडीच महिन्यांपासुन पालघर जिल्ह्यातील (ग्रामीण) कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरत असलेल्या बोईसरबाबत दिलासादायक बाब समोर येत आहे. येथील दैनंदिन रुग्णांची आकडेवारी गेल्या आठवड्यापासुन काहीशी नियंत्रणात आली असल्याचे आकडेवारीवरुन दिसुन येत आहे.

राज्य शासनाने टाळेबंदी (लॉकडाऊन) बाबतचे काही नियम शिथिल केल्यानंतर बोईसरमधील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे दैनंदिन प्रसिद्ध होणार्‍या आकडेवारीवरुन दिसत होते. 18 ऑगस्ट रोजी तर एकाच दिवसात विक्रमी 81 नवीन रुग्णांची नोंद बोईसरमध्ये झाली होती. त्यातच एका मराठी वृत्तपत्राने आपल्या वृत्तात बोईसरमध्ये 40 हजारांच्या आसपास कोरोना रुग्ण असण्याची शक्यता आरोग्य विभागातील सुत्रांच्या हवाल्याने दिल्यानंतर शहरात चांगलीच दहशत पसरली होती. बोईसरमधील औद्यागिक क्षेत्र व मोठी लोकसंख्या पाहता ही शक्यता नाकारता देखील येत नव्हती. असे असताना बोईसरकरांसाठी आता दिलासादायक बातमी असुन मागील आठवड्याभराची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास दैनंदिन रुग्णांचा आकडा काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचा पाहायला मिळत आहे.

बोईसरमधील गेल्या सात दिवसांची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली असता केवळ 27 ऑगस्ट रोजी येथील नविन रुग्णांचा आकडा 30 च्या पार गेला आहे. 27 ऑगस्टला येथे 39 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर 25 ऑगस्ट रोजी सर्वात कमी अर्थात केवळ 7 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, काल 30 ऑगस्ट रोजी 29 नवे रुग्ण, 29 ऑगस्ट रोजी 30 नवे रुग्ण, 28 ऑगस्ट रोजी 23 नवे रुग्ण व 27 ऑगस्ट रोजी 19 नवे रुग्ण आढळून आले होते.

आज ६ रुग्णांची नोंद!
आज, ३१ ऑगस्ट रोजी देखील बोईसरमध्ये केवळ ६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून पालघर तालुक्यात 76 तर जिल्ह्यात (ग्रामीण) एकूण 116 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments