तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये अपघाती मृत्यू कसे पचवले जातात?

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मृत्यू कसे पचवले जातात आणि अनेक गिधाडे परस्पर सहकार्याने कसे लचके तोडतात ह्याचे नमुना उदाहरण पहा!

तारापूर एमआयडीसी मध्ये असलेल्या प्लॉट क्र. के 45/46 वरील एस. एस. फार्माकेम ह्या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये दिनांक 7 ऑक्टोबर 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास रोहिदास तुकाराम बारी ह्या कामगाराला संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या तोंडाला फेस आला होता असे एस. एस. फार्माकेम व्यवस्थापनाचे विधान आहे. कारखान्यात झालेल्या विषारी वायुच्या गळतीने रोहिदास उंचीवरुन खाली पडून अपघात झाल्याचे सांगितले जाते.

अपघात झाल्यानंतर सायंकाळी 7.15 वाजता रोहिदासला रिक्षाने बोईसरच्या गोसालीया पार्क येथील आशिर्वाद रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉ. पराग कुलकर्णी होते. त्यांनी एस. एस. फार्माकेमचे व्यवस्थापक सुनील तुकाराम झोपे यांना रुग्णाला वरती आणू नका असे सांगून खाली उभ्या रिक्षातील रोहिदास याला जागेवर जाऊन तपासले व त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. (याचा अर्थ झोपे व डॉक्टर यांना तपासणी पूर्वीच रोहिदासच्या मृत्यूचा अंदाज आला होता.)

त्यानंतर झोपे यांनी कारखान्याचे मालक संजय सांगेकर यांना फोन करुन रोहिदासचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर मृतदेह तृंगा हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु रिक्षा चालकाने मृतदेहाची वाहतूक करण्यास नकार दिल्यामुळे रुग्णवाहिका मागवण्यात आली.

7.45 वाजता रोहिदासचा मृतदेह रुग्णवाहिकेतून तृंगा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. तृंगा हॉस्पिटलने मृतदेह दाखल करुन घेतला. रोहिदासचे हृदयाचे ठोके थांबले होते. रक्तदाब तपासला असता तो शून्य आला. डॉ. स्वप्नील शिंदे यांनी रोहिदासचा ईसीजी काढला असता सरळ रेषा आली. मग रोहिदासचा मृत्यू झाल्याचे पुन्हा एकदा जाहीर करण्यात आले. रोहिदासचा तृंगा हॉस्पिटलमध्ये आणण्याच्या आधीच मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली.

दरम्यान एस. एस. फार्माकेम व्यवस्थापनातर्फे सुनील झोपे व अन्य 2 जणांनी मृत रोहिदासच्या कुटूंबीयांना 5 लाखांची मदत व ग्रॅच्युईटी आणि कामगार विमा मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. रोहिदासचा मुलगा मयूर व अन्य 2 नातेवाईकांनी हा प्रस्ताव मंजूर करुन त्यावर संमतीदर्शक सह्या केल्या.

त्यानंतर तृंगा हॉस्पिटलचे डॉ. स्वप्नील शिंदे, रोहिदासचा मुलगा मयूर व अन्य 2 नातेवाईक, एस. एस. फार्माकेम व्यवस्थापनातर्फे सुनील झोपे व अन्य 2 प्रतिनिधी यांच्यात शवविच्छेदन न करण्याबाबत ठरले. त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाल्यास त्याला हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असणार नाही असे संयुक्त लिखाण करण्यात आले. रोहिदासचे शवविच्छेदन न करता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रोहिदासचा मृत्यू बिषबाधेमुळे बेशुद्ध होऊन उंचीवरून खाली पडून झाला की गुदमरून झाला कि त्याच्यावर विषबाधा झाली कि हृदयविकाराने झाला?
मृत्यूचे कारण अधांतरीच राहिले. सर्व सहमतीने व संगनमताने प्रकरण दडपण्यात आले. मृत्यू संशयास्पद होता हे मात्र ठळकपणे स्पष्ट झाले.

रोहिदासवर तडियाळे, तालुका डहाणू येथे (त्याच्या गावी) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर झोपेचे सोंग घेतलेले पोलीस जागे झाले. त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अपघाती मृत्यूची नोंद न घेता तपास सुरु केला. त्यावेळी बोईसरचे प्रभारी अधिकारी होते पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार.

दिनांक 9 ऑक्टोबर 2017 रोजी पोलीस निरिक्षक यांनी जावक क्र. 7403 अन्वये तृंगा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी यांना शवविच्छेदन न करता, मृतदेहाचा ताबा कंपनी व नातेवाईकांच्या ताब्यात दिल्या प्रकरणी चौकशीसाठी 10 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता बोलावले. एस. एस. फार्माकेमचे मालक, व्यवस्थापक, रोहिदासचे नातेवाईक अशा सर्वांचे जाबजबाब घेण्याचे नाटक वठविण्यात आले. आणि आपल्या हिश्याचा लचका तोडून प्रकरण दडपण्यात आले.

30 ऑक्टोबर 2017 रोजी मृत्यूचे कारण दर्शविणारा मृत्यूचा वैध दाखला व आवश्यक कागदपत्रांशिवाय सालवड ग्रामपंचायतीने मृत्यूची नोंद करुन मृत्यूचा दाखला दिला.

दरम्यान, रोहिदासच्या अपघाती मृत्यू झाल्याचे नमूद करून एस. एस. फार्माकेम व्यवस्थापनाने ” फ्युचर जनरल इंडिया इन्श्युरन्स कंपनी ” कडे विम्याची रक्कम मिळविण्यासाठी रितसर प्रस्ताव पाठविला. त्याबाबत इन्श्युरन्स कंपनीने ईमेलद्वारे काही कागदपत्रांची मागणी केली. 17 नोव्हेंबर रोजी एस. एस. फार्माकेम तर्फे इन्श्युरन्स कंपनीला मागणी केलेल्या कागदपत्रांची अंशतः पूर्तता करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामध्ये रोहिदासचा मृत्यू अपघाती असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे. विमा प्रस्तावात पोलिसांनी एफआयआर, पंचनामा, पोलीस तपासाचे टिपण व शवविच्छेदन अहवाल हस्तांतरित केलेला नसल्याचे नमूद करण्यात आले.

22 नोव्हेंबर 2017 रोजी इन्श्युरन्स कंपनीने विचारणा केल्यानंतर सर्व संबंधितांनी लेखी म्हणणे मांडले. त्यामध्ये नातेवाईकांनी रोहिदासला कुठलाही आजार नव्हता व कुठल्याही प्रकारचे औषधोपचार चालू नव्हते असे निवेदन केले. त्याचवेळी, प्रत्यक्षात एफआयआर, पंचनामा व शवविच्छेदन झाले नसल्याचे मान्य केले.

दुसरीकडे, दिनांक 23 नोव्हेंबर 2017 रोजी एस. एस. फार्माकेम व्यवस्थापन व रोहिदासचे कुटूंबीय यांच्यात हेमंत पाटील ह्या नोटरीसमोर करार नोंदविण्यात आला. त्या करारात कारखाना व्यवस्थापनाकडून 6 लाख 50 हजाराची सानुग्रह मदत मिळाल्याचे व रोहिदासचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे नातेवाईकांनी मान्य केले.

12 डिसेंबर 2017 रोजी इन्श्युरन्स कंपनीने तृंगा हॉस्पिटलकडे रोहिदाससंबधीची कागदपत्रे आणि मृत्यूचे कारण नमूद केलेला मृत्यूचा दाखला मागितला. शवविच्छेदन न झाल्यामुळे तृंगा हॉस्पिटलला मृत्यूचे कारण स्पष्ट करता आले नाही. त्यांनी रोहिदासचा केसपेपर व मृतदेह ताब्यात देताना केलेले लिखाण सादर केले. सरळ रेषेच्या ईसीजीच्या अहवालावर पोलीस निरीक्षकाचा सही व शिक्का असलेली नक्कल देखील सादर करण्यात आली.

परंतु इन्श्युरन्स कंपनीचे समाधान झाले नाही. अपघाती मृत्यूची पोलीस स्टेशनमध्ये नोंद नसल्याने व मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्याने, तसेच दाव्यामध्ये विसंगती असल्याने रोहिदासच्या अपघाती मृत्यूच्या विम्याचा दावा फेटाळण्यात आला.

एस. एस. फार्माकेम व्यवस्थापन, डॉ. पराग कुलकर्णी, डॉ. स्वप्नील शिंदे व तृंगा हॉस्पिटल, सालवड ग्रामपंचायतीचा तत्कालीन ग्रामसेवक, बोईसरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी यांनी बेजबाबदार वर्तन करुन आपले कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यात कसूर केली असून रोहिदासचा मृत्यू संगनमताने पचवला आहे.

वास्तविक अपघात झाल्यानंतर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाला कळविणे बंधनकारक आहे. अपघाताची वर्दी संबंधित पोलीस स्टेशनला दिली पाहिजे. अपघातग्रस्तावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाने देखील पोलीसांना वर्दी दिली पाहिजे. कामगार आयुक्तांसमोर नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. प्रकरणे दडपली गेल्यास अशा यंत्रणांनी स्वतःहून चौकशी करुन आवश्यक कारवाई केली पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही.

Print Friendly, PDF & Email

comments