कोरोना : पालघर तालुक्यातील आजची रुग्णसंख्या 200 पार; बोईसरमध्ये 81, तर पालघरमध्ये 53 रुग्ण आढळले

0
3830

बोईसर : नुकत्याच एका वृत्तपत्राने आपल्या वृत्तात आरोग्य अधिकाऱ्याच्या हवाल्याने बोईसरमध्ये 40 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा आकडा जरी अधिकृत नसला तरी बोईसरची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनत चालली आहे. आज पुन्हा बोईसरमधील दैनंदिन रुग्णांच्या आकड्याने नवीन उचांक गाठला असून 81 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाच दिवसांचा लॉकडाऊन राबवलेल्या पालघर परिसरातही 53 रुग्ण आढळले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) एकूण 255 नवे कोरोना रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यातील 219 रुग्ण केवळ पालघर तालुक्यात आढळले आहेत. पालघर तालुक्यातील मोठ्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यानुसार 134 रुग्ण बोईसर (81) व पालघर (53) मध्ये तर उर्वरित 85 रुग्ण इतर 27 गावांमधील आहेत. पालघर पाठोपाठ डहाणू तालुक्यात आज 12 रुग्ण, वसई ग्रामीण व वाड्यात प्रत्येकी 8, जव्हारमध्ये 4, विक्रमगडात 3 तर मोखाड्यात एक रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बोईसरमध्ये उपाययोजना वाऱ्यावर?

पालघर तालुक्यातील मोठी औद्योगिक नगरी असलेले बोईसर शहर कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट म्हणून पुढे आले आहे. येथिल दररोजची रुग्ण वाढीची संख्या 30 ते 70 च्या आसपास आहे. येथे आढळणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत निम्मे रुग्ण कमी असताना पालघर व डहाणू तालुका प्रशासनाने लॉकडाऊन लागू करून वाढत्या रुग्ण संख्येला रोखण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या भागांमध्ये प्रशासनातर्फे कोरोनाबाबत आवश्यक जनजागृती व सार्वजनिक सूचना देखील देताना पहावयास मिळते. मात्र बोईसर शहरात साधी जनजागृती देखील केलेली पाहायला मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने बोईसर शहराला वाऱ्यावर सोडून दिले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments