तारापूर औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट; 1 ठार, चार जखमी

0
3328

बोईसर : बोईसर औद्योगिक नगरी पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरली असून येथील नंडोलिया नामक रासायनिक कारखान्यात हा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक कामगार ठार तर 4 कामगार जखमी झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर औद्योगिक वसाहतीतील टी-141 या प्लॉटवर नंडोलिया ऑरगॅनिक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नामक रासायनिक उत्पादन घेणारी कंपनी आहे. या कंपनीमध्ये डाय क्लोरो बेंजामाईड एजॉल या प्रोडक्टचे उत्पादन सुरू असताना मटेरियलमध्ये पाणी जास्त झाल्याने डाय क्लोरो डेस्टिलेशनची प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेदरम्यान सायंकाळी 19:30 वा रियाक्टरचा प्रेशर वाढून स्फोट झाला. कंपनीतील ऑपरेटर संदीपकुमार सिंग याने पोलिसांना ही माहिती दिली असून यामध्ये मोहम्मद मोहसीन अल्ताफ (वय 30 वर्ष), दिलीप गुप्ता (वय 28 वर्ष), उमेश कुशवाहा (वय 22 वर्ष) व प्रमोदकुमार मिश्रा (वय 35 वर्ष) असे चार कामगार जखमी झाले आहे. तर संदीप कुशवाहा नामक कामगाराचा मृत्यू झाला आहे. जखमींना बोईसरमधीलच तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या कंपन्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. तर सुमारे 10 ते 12 किलोमीटर पर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला. या कंपनीपासून काही अंतरावरच सालवड व शिवाजीनगर ही गावे असून स्फोटामुळे येथे मोठा हादरा बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, घटनास्थळी पालघरचे अपर पोलीस अधीक्षक, बोईसरचे SDPO, तहसीलदार सुनिल शिंदे व पालघर एमपीसीबीचे अधिकारी मनीष होळकर (midc फायर ब्रिगेड) आदी हजर आहेत.

वायू गळतीमुळे दुर्गंधी पसरली
या स्फोटामुळे वायू गळती होत असल्याची माहिती पुढे आली असून कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी दुर्गंधी पसरल्याचे सांगण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments