89 वर्षीय जयंतीलाल नागशेट यांची कोरोनावर मात

0
3371

दि. 6 ऑगस्ट : डहाणूतील वरिष्ठ नागरिक जयंतीलाल वाघमल नागशेट यांनी कोव्हिड 19 च्या संसर्गावर मात केली असून ते रुग्णालयातून परतले आहेत. त्यांच्या अस्थिरोगतज्ज्ञ नातवाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर 21 जुलै रोजी जयंतीलाल यांचीही तपासणी केली असता 24 जुलै रोजी त्यांचाही अहवाल पॉझिटीव्ह आला. जयंतीलाल यांचे वय लक्षात घेता त्यांना मुंबईतील होली स्पिरीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर 4 ऑगस्ट रोजी त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. काल (5 ऑगस्ट) त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालय प्रशासनाने त्यांना पुष्पगुच्छ देऊन दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

वेळीच सावधगिरी बाळगल्याने योग्य वेळी योग्य निदान:
जयंतीलाल यांच्या डॉक्टर नातवाला गंध येत नसल्याचे जाणवल्याने कोरोनाचा संसर्ग झाल्याची शंका येऊन त्याने स्वतःला होम क्वारन्टाईन करुन घेतले व तपासणी देखील केली. 19 जुलै रोजी त्याचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर सर्व नागशेट कुटूंबीयांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये जयंतीलाल यांचीही तपासणी झाली व वेळीच निदान झाल्याने त्यांनी कोरोनावर मात केली.

जयंतीलाल यांचे पुतणे कुमार हे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष असून सर्व नागशेट कुटूंब एकत्रच रहातात. त्यांनीही कोरोना चाचणी करुन घेतली होती व त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा मदतकार्यात सक्रीय झाले आहेत. सर्वांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली पाहिजे. त्यातूनही दुर्दैवाने संसर्ग झालाच तर, तशी लक्षणे दिसली तर किंवा कोरोना संसर्गित व्यक्तीशी निकटचा संपर्क आल्यास कुठलेही दडपण किंवा भय न बाळगता तपासणी करुन घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया कुमार यांनी राजतंत्रशी बोलताना मांडली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments