डहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6! 4 ऑगस्ट पासून 10 दिवसांचे कडक लॉक डाऊन

0
11908

डहाणू शहरात आज (3 ऑगस्ट) एकाच दिवसांत 3 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची दुख:द बातमी हाती आली आहे. डहाणूचे माजी नगराध्यक्ष शशिकांत बारी (65), भास्करभाई अमृतलाल मेहता (73) व हेमंत हसमुखलाल बाफना (66) यांचे कोरोना बाधेमुळे निधन झाले आहे. तत्पूर्वी 1 ऑगस्ट रोजी कुमुदबेन मोदी (84) यांचे निधन झाले होते. सोहन कर्णावट (70) व दत्तू धोडी (62) यांचे जुलै महिन्यात निधन झाले होते.

शशिकांत बारी यांचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असता हृदयविकाराचा झटका आला. भास्करभाई यांना श्वास घ्यायला अडचण आल्यामुळे त्यांची तपासणी केली असता ते पॉझिटीव्ह आले व उपचारादरम्यान मृत्यू पावले. तर हेमंत बाफना हे अपघातग्रस्त झाल्याने शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले असता केलेल्या तपासणीत पॉझिटीव्ह निष्पन्न झाले होते.

डहाणू शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज सरासरी 15 जणांची भर पडत आहे. 2 जुलै पर्यंत कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 222 वर पोहोचला असून प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या 28 झाली आहे. 980 जणांना होम क्वारन्टाईन करण्यात आले आहे. 103 कोरोनाबाधीत पूर्णपणे बरे झाले असून 119 जणांवर उपचार चालू आहेत. त्यातील 32 लक्षणे न दिसणाऱ्या कोरोना पॉझिटीव्हना स्वतःच्या घरी क्वारन्टाईन करुन देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गातून मृतांची संख्या आता 6 झाली आहे.

उर्वरीत डहाणू तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 381 वर पोचला असून त्यातील 291 जण पूर्णपणे बरे झाले आहेत व 90 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 3 मृत्यू झाले आहेत. या आकडेवारीच्या तुलनेत डहाणू शहर तालुक्यातील मोठा हॉटस्पॉट ठरला आहे.

मुख्याधिकारी विरूध्द नगराध्यक्ष वादात अडकलेले लॉकडाऊन 4 ऑगस्ट पासून!
डहाणू शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 पेक्षा कमी व मृतांची संख्या 0 असताना एका दिवसांत 7 कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाल्यानंतर डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी 14 जुलै रोजी तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे 7 दिवसांच्या लॉक डाऊनचा प्रस्ताव ठेवला होता. 16 ते 23 जुलै दरम्यान लॉक डाऊनला तत्वत: मान्यता मिळाली होती. परंतु नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी लॉक डाऊनला विरोध केला होता असे समजते. राजपूत यांनी मुख्याधिकारी पिंपळेंवर कुरघोडी करण्याच्या भुमीकेतून विरोध केल्याचे मानले जाते.

त्यानंतर कोरोनाबाधीतांचा आकडा झपाट्याने वाढत गेला. अखेर भाजपचेच आरोग्य सभापती भाविक सोरठी (21 जुलै रोजी अर्ज) यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (विरोधी पक्ष) गटनेत्या किर्ती मेहता यांनी (22 जुलै रोजी अर्ज) लॉकडाऊनची मागणी केली. लोकांकडूनच लॉक डाऊनची मागणी जोर धरु लागली. rajtantra.com वर घेतलेल्या जनमताच्या अंदाजात 93% लोकांनी लॉक डाऊनच्या बाजूने कौल दिला होता. नागरिकांची भावना लक्षात घेता 30 जुलै रोजी प्रभारी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रजीत नायर हे तातडीने डहाणूला आले व लॉक डाऊनवर शिक्का मारुन गेले. बकरी ईद व रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन 4 ऑगस्टपासून होत आहे.

लॉक डाऊनचा निर्णय घेण्यास झालेल्या विलंब कालावधीत कोरोनाबाधीतांचा आकडा चौपटीपेक्षा जास्तीने वाढून तो 222 झाला आहे व 6 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. लॉक डाऊनवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मात्र नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी मागणी केल्यामुळे लॉक डाऊन होणार असल्याच्या पोस्ट सोशल मिडियावर फिरु लागल्या आहेत. तथापि अधिकृत सुत्रांकडून त्यास दुजोरा मिळालेला नाही किंवा तसे पत्र रेकॉर्डला आढळून येत नाही. लॉक डाऊनवरुन आता राजकारण व श्रेयवाद सुरु झाला आहे.

  • असे असेल लॉक डाऊन
    4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या कालावधीत डहाणू शहरातील सर्व दुकाने, आस्थापना, व्यवसाय व कारखाने बंद ठेवले जाणार आहेत. सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेस दुधविक्रीस मात्र परवानगी असेल. शहरातील शासकीय कार्यालये, दवाखाने व रुग्णालये, बँका व औषधांची दुकाने नियमित वेळेत चालू राहतील.
Print Friendly, PDF & Email

comments