पालघर, दि. 28 : अत्यंत प्रतिकूल परस्थिती असताना तसेच दोन्ही हात नसताना पालघर तालुक्यातील कल्लाले गावातील कल्पेश विलास दौडा या विद्यार्थ्याने बारावी इयत्तेत 68 टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. बिकट परिस्थितीला आव्हान देत जिगरबाज कामगिरी करणार्‍या कल्पेशबाबत जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी थेट कल्लाले गाव गाठत कल्पेशच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी कल्पेशचे कौतुक तर केलेच, मात्र त्याला पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात देखील दिला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी आज अचानक कल्पेशच्या घरी भेट दिल्यामुळे कल्पेशसह त्याचे आई-वडील भारावून गेले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी कल्पेशचे कौतूक करत त्याला वीस हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच कल्पेशचे आई-वडील व दोन बहिणींना देखील नवीन कपडे, राशन व इतर अत्यावश्यक वस्तू भेट म्हणून दिल्या. कल्पेशचा पुढील शिक्षणाचा खर्च जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय व तहसील कार्यालया मार्फत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यातील कोणताही विद्यार्थी बिकट परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे आश्‍वासन दिले.

कांबळगाव येथील कोव्हिड केअर सेंटरला भेट

दरम्यान, कल्पेशच्या घरी भेट दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी अचानक कांबळगाव येथील कोव्हिड केअर सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णाशी संवाद साधला. तुम्हाला औषधं, गोळ्या नियमित मिळतात का? तुम्हाला चांगल्या प्रतीचे जेवण मिळते का? नास्त्यामध्ये काय देतात? इथे काही अडचण आहे का? असे अनेक प्रश्न विचारून जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी कोव्हिड केअर सेंटरचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी यांनी अचानक भेट दिल्याने रुग्णांनी देखील समाधान व्यक्त केले. यावेळी पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments