बोईसर : गणेशनगर हत्या प्रकरण; आरोपी कुटूंब अखेर गजाआड

0
5927

बोईसर, दि. 24 : पाच दिवसांपुर्वी येथील गणेशनगर भागातील एका बंद घरात ड्रममध्ये महिलेचा सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली असुन सुन बुलबुल झा हिने आपल्यावर केलेली छळवणूकीची तक्रार ती मागे घेत नसल्याने आपण तिची हत्या केल्याची व पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने मृतदेह ड्रममध्ये कोंबून फरार झाल्याची कबूली अटक आरोपींनी दिली आहे.

गणेशनगर येथील लोकेश जैन यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या झा नामक एका कुटूंबाचे लॉकडाऊनमुळे मागील 3 ते 4 महिन्याचे भाडे थकल्याने 19 जुलै रोजी जैन हे गणेशनगरला पोहोचले. यावेळी त्यांनी घराला कुलूप असल्याचे पाहून आजूबाजूला विचारपूस केली असता दिड वर्षांपुर्वीच सदर कुटूंब गावी गेलं असल्याचे शेजारच्यांनी त्यांना सांगितले. यानंतर जैन यांनी झा कुटूंबाशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकवेळा प्रयत्न करूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. शेवटी जैन यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता घरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे त्यांनी तात्काळ बोईसर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बाथरुमवरील पोटमाळ्यावर ठेवलेला ड्रम खोलून पाहिला असता त्यात महिलेचा सांगाडा आढळून आला.

मागील दिड वर्षांपासुन घरात कुणीही राहात नसताना संबंधित कुटूंब घरमालकाला नियमित घरभाडे देत असल्याने सदर कुटूंबानेच ही हत्या केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले होते व त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून एक तपास पथक नेमले होते. सदर पथकाने उपलब्ध माहितीवरुन आरोपींचा त्यांच्या मुळगावी बिहार येथे शोध घेतला. मात्र तेथे तेे आढळून आले नाहीत. तेथे अधिक तपास केला असता सदर कुटूंब हरियाणा राज्यात आपली ओळख लपवून राहात असल्याची गुप्त माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार तपास पथकाने हरियाणा राज्य गाठून तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने काल, 23 जुलै रोजी सदर कुटूंबातील चारही जणांना अटक केली.

पवन गणेश झा (सासरा), बच्चुदेवी पवन झा (सासू), दिपक पवन झा (पती) व नितु मुकेश ठाकुर (नणंद) अशी अटक आरोपींची नावे असुन सुन बुलबुल झा हिने आपल्याविरुद्ध केलेली छळवणूकीची तक्रार मागे घेत नसल्याने आपण तिची हत्या केल्याचे व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ड्रममध्ये कोंबून फरार झाल्याची कबुली या चारही जणांनी दिली आहे.

बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप कसबे, पोलीस उप निरिक्षक आशिष पाटील, पोलीस हवालदार सुरेश दुसाने, पोलीस शिपाई जामदार व थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली असुन अधिक तपास सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email

comments