कोरोना पॉझिटीव्ह असूनही लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना घरी राहून उपचार घेणे शक्य! – जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

पालघर, दि. 23 : तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीस कुठलाही त्रास व लक्षणे नसतील, तर अशा रुग्णांना घरी राहून उपचार घेणे शक्य आहे. मात्र त्यासाठी घरात विलगीकरणासाठी पुरेशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यातील नोडल ऑफिसर व वैद्यकीय अधिकारी ह्याबाबत निर्णय घेऊ शकतील. लहान घरांत अशा परवानग्या देणे त्या व्यक्तीच्या कुटूंबीयांसाठी धोक्याचे असल्याने सरसकट परवानग्या मात्र देता येणार नाहीत. अशा अनेक समस्या आणि अडचणी आहेत! पण तुम्ही आणि आम्ही मिळून त्या सोडवू! प्रत्येक जीव आपल्याला वाचवायचा आहे! अशी भूमिका पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली.

लॉक डाऊन लागू झाल्यापासून 4 महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यापुढे आठवड्यातून किमान एकदा पत्रकारांशी संवाद साधण्याची भूमिका देखील शिंदे यांनी मांडली. प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांद्वारे विविध समस्या आमच्यापर्यंत पोहोचतात. त्याची दखल घेतली जाते. येत्या 8 दिवसांत क्वारन्टाईन सेन्टर्स व कोव्हीड उपचार केंद्रातील समस्या निकाली काढल्या जातील. तेथे स्वच्छता, स्वच्छ पाणी पुरवठा, सकस आहार, सीसीटीव्ही कॅमेरे, जनरेटर सेट, आंघोळीसाठी गरम पाणी अशा सर्व मूलभूत गरजांवर नजर ठेवण्यासाठी अभियंत्यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमले आहे. जबाबदारीत कुचराई दाखवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाया करण्यास सुरुवात देखील झालेली असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

एक आठवड्यापासून पालघर जिल्ह्यात घशाचे नमुने तपासणीची संख्या वाढवल्यामुळे त्यातून कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींचा आकडा देखील स्वाभाविकपणे वाढताना दिसतो आहे. हा आकडा पाहून पालघर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात नसल्याचा निष्कर्ष न काढता वस्तुस्थिती समजून घ्यावी. आपण पालघर जिल्ह्याचा मृत्यूदर 1 टक्क्याच्या खाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि निश्चितच सफल होऊ असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेतील काही ठळक मुद्दे

संपूर्ण पालघर जिल्ह्याची (वसई विरार महानगर क्षेत्रासह) आकडेवारी:- आजमितीस एकूण 70 हजार 454 तपासणी करण्यात आली असून त्यातील 68 हजार 480 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 55 हजार 833 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले व 12 हजार 597 (18%) व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील 8 हजार 525 जण पूर्णपणे बरे झाले असून 3 हजार 837 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील 10 जण तीव्र बाधीत आहेत. आजपर्यंत 235 मृत्यू (1.86% मृत्यूदर) झाले आहेत.

 • पालघरच्या ग्रामीण भागाची आकडेवारी (वसई विरार महानगर क्षेत्र वगळून) दिलासादायक:-
  आजमितीस एकूण 14 हजार 119 तपासणी करण्यात आली असून त्यातील 13 हजार 65 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 10 हजार 654 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले व 2 हजार 411 (18%) व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील 1 हजार 807 जण पूर्णपणे बरे झाले असून 572 रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 32 मृत्यू (1.3% मृत्यूदर) झाले आहेत.
 • 58 व्हेन्टीलेटर उपलब्ध:-
  जिल्ह्यामध्ये 14 व्हेन्टीलेटर्स आधीच उपलब्ध होती. 7 विकत घेण्यात आली. 3 सीएसआर निधीतून उपलब्ध झाली व आता 34 शासनाकडून आली आहेत. 10 रुग्ग्णांना व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले आहे. व्हेंटीलेटर उपलब्ध असली तरी पुरेशा संख्येने इन्टेन्सीव्हीस्ट उपल्ब्ध नाहीत. आवश्यक ते तज्ञ डॉक्टर मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
 • खासगी डॉक्टरांची मदत:-
  रिव्हेरा, आयडियल व टिमा ह्या कोव्हीड केअर सेन्टर्सना खासगी डॉक्टर उत्तम पद्धतीने मदत करीत आहेत. क्वारन्टाईन सेंटर्सना देखील खासगी डॉक्टरांनी सेवा पुरवली आहे. खासगी डॉक्टरांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे.
 • खासगी रुग्णालयांच्या बिलांवर चाप:-
  खासगी रुग्णालयातून कोरोनावर उपचार घेतल्यास वारेमाप बिले लावल्यात आल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून अशा बिलांची ऑडीटरमार्फत तपासणी केली जात आहे. औषधांचा काळाबाजार होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.
 • सर्व पद्धतीची औषधे व वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध:
  कोव्हीड उपचारांसाठी आवश्यक ती सर्व औषधे व साधनसामग्री, एन 95 मास्क, पीपीई किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. कमतरता भासणार नाही ह्याची पुरेशी काळजी घेतली जात आहे. घशाच्या थुंकीचे नमुने तपासणीला नेण्यासाठी आवश्यक अशी 15 हजार व्हीटीएम किट उपलब्ध आहेत.
 • डहाणूच्या तपासणी केंद्राची क्षमता वाढविणार:
  डहाणूच्या उप जिल्हा रुग्णालयात घशाच्या थुंकीचे नमुने तपासण्यासाठी सुविधा उपलब्ध केलेली असली तरी ह्या केंद्राची क्षमता केवळ 20 नमुने तपासण्याची आहे. आता येथे ऑटोपीसीआर ही अद्ययावत यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यानंतर दररोज 500 नमुने तपासणे शक्य होणार आहे. त्यामुळे एकाच दिवसांत तपासणी अहवाल मिळणे शक्य होणार आहे.
 • आवश्यकतेपेक्षा 4 पट सुविधा उपलब्ध:
  कुठलीही लक्षणे न दिसणाऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचारासाठी आज 2270 बेड उपलब्ध आहेत. त्यातील 438 बेडचा वापर होत आहे. ऑक्सिजनची सुविधा असणारे 436 बेड उपलब्ध आहेत. त्यातील 62 बेड वापरात आहेत. समर्पीत कोव्हीड रुग्णालयात 455 बेड उपलब्ध असून त्यातील 186 बेड वापरात आहेत. एकूण उपलब्ध 3161 बेडपैकी 686 (22%) बेड वापरात आहेत. तरीही भविष्यातील सुरक्षितता म्हणून नवीन 1000 बेडची सुविधा उपलब्ध करणे प्रस्तावित आहे.
 • 29 खासगी रुग्णवाहिका ताब्यात:
  रुग्णवाहिकांची संख्या पुरेशी असली तरी त्यासाठी चालक पुरेशा संख्येने उपलब्ध नाहीत. मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे कधीकधी रुग्णवाहिकेतून अधिक संख्येने रुग्णांची वाहतूक केल्याच्या तक्रारी येत आहेत. असे प्रकार उद्भवू नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 • तपासणी अहवाल संबंधितांना उपलब्ध करणार:
  बऱ्याच वेळेस अनेक जणांचे एकत्रित अहवाल प्राप्त होत असतात. त्याद्वारे सर्वांचे अहवाल जाहीर होतात. त्यास्तव ते दिले जात नसल्याचे प्रकार घडले आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी स्वतंत्र अहवाल बनवून देणे काही वेळेस शक्य झाले नसले तरी येथून पुढे सर्वांना तपासणी अहवाल उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सबंधितांना देण्यात आल्या आहेत.
Print Friendly, PDF & Email

comments