गुन्हा घडण्याआधीच 6 दरोडेखोरांना पकडले; सागरी पोलिसांची कारवाई!

0
4271

दि. 20 जुलै: गटारी अमावस्या कोळंबी प्रकल्पातील कोळंबी चोरुन साजरी केली जाऊ नये यासाठी लावलेल्या विशेष पोलिस बंदोबस्ताच्या जाळ्यात दरोडेखोर सापडले आहेत. केळवा येथील सागरी पोलिस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली असून 6 दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 1 गावठी बंदूक, 2 मोटारसायकल व मोबाईल, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

केळवे पोलिस स्टेशनच्या हद्दीत ह्या आधी कोळंबी प्रकल्पांतील कोळंबी लुटल्याचे प्रकार लक्षात घेता गटारी अमावास्येला मांसाहारी लोकांकडून असले प्रकार होऊ नयेत यासाठी विशेष गस्तीच्या सूचना पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे केळवे सागरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत विविध गस्ती पथके तैनात करण्यात आली होती. अशाच एका पथकाला 19 जुलैच्या भल्या पहाटे 2.30 वाजता टेंभी खोडावे येथे एक संशयीत इसम आढळला. पोलिसांना घाबरुन त्याने हातातील 2 काडतुसे रस्त्याच्या कडेला टाकून दिली. पोलिसांना संशोधनासाठी आल्यानंतर त्यांनी ह्या इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता महेंद्र नायको भोईर (35) असे नाव सांगितले. त्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांना हे यश मिळाले आहे.

महेंद्रने टेंभी खोडावे येथील जुन्या जेटीवर साथीदार बसल्याची खबर दिल्यानंतर पोलिसांनी तेथे धडक दिली. तेथे महेंद्रचे साथीदार बाळू विष्णू पाटील (29), शिवदास नायको पाटील (36), दिनेश विष्णू पाटील (45), दहेश अनंत गावड (32), नितीन शांताराम पाटील (35) आढळून आल्याने त्यांना अटक केली आहे. सर्वजण टेंभी खोडावे येथील रहाणारे आहेत. महेंद्र हा किरईपाडा दारशेत (ता. पालघर) येथील रहाणारा आहे. एक संशयीत अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे. त्यातील दहेश हा कर्णबधिर आहे. हे सर्व जण सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी एकत्र आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

आरोपींना पकडण्याची कामगिरी एपीआय मानसिंग पाटील, एएसआय प्रवीण वडे, पोलिस नाईक भीमराव शिरसाट, नवनाथ भगत, विजय वाघमारे, प्रवीण कमटे, पोलिस शिपाई जयदीप सांबरे, राजेंद्र घुगे, संदीप खिल्लारे, अजय मोरे, सोमनाथ घनवट, अशोक भताणे, गणपत गोपाळे, भरत मालकरी, निर्मला वर्पे, हिना पठाण, होमगार्ड आहाडी व कामडी यांच्या पथकाने पार पाडली. त्यांना पोलिस मित्र प्रशांत मानकर, मिकेश शेट्टी, प्रवीण पाटील व सुनिल पाटील यांचे साहाय्य मिळाले.

Print Friendly, PDF & Email

comments