पालघर जिल्ह्यात 24 तासांत 402 नवे रुग्ण – 211 कोरोना मृत्यू !

0
2567

एक पत्रकार मित्राला कोरोनाची लागण झाली असून त्याला 15 जुलै रोजी रात्री डहाणू उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी आज दुपारी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तो रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत होता. अखेर आज रात्री उशीरा ही प्रतिक्षा संपली. मात्र गच्च भरलेल्या रुग्णवाहिकेतून (एमएच 02 सीई 9734) डहाणू ते रिव्हेरा डेडिकेटेड कोव्हीड सेंटर (विक्रमगड) प्रवास करताना त्याचा जीव टांगणीवर लागला. त्याने मग सेल्फी काढून आपली भावना दैनिक राजतंत्रकडे मांडली. हवे तर ट्रकमधून न्या, पण सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे अशी त्याची भावना होती.

दि. 17 जुलै: पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मागील 6 दिवसांत 33 जणांनी आपले प्राण गमावले असून मृत्यूंची संख्या 211 झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक 184 मृत्यू वसई विरार महानगर क्षेत्रातील असून वसई ग्रामीण क्षेत्रात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालघर तालुक्यात 3 मृत्यू वाढले असून संख्या 11 झाली आहे. जव्हार तालुक्यात 2 मृत्यू, वाडा तालुक्यात 2 मृत्यू ही संख्या कायम असून विक्रमगड तालुक्यात 1 कोरोना संसर्गामुळे 1 मृत्यू वाढून संख्या 2 झाली आहे.

जिल्ह्यामध्ये 6 दिवसांत 1731 कोरोनाग्रस्तांची भर पडली असली तरी, 986 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या मात्र 727 ने वाढली आहे. 12 जुलै रोजी 2514 जण रुग्णालयात दाखल होते. आज ही संख्या 3231 इतकी वाढली आहे.

पालघर जिल्ह्याच्या वसई तालुका वगळता उर्वरीत भागात, 6 दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या 242 ने वाढून 1604 झाली आहे. मृत्यूचा आकडा 4 ने वाढून 17 झाला आहे.

तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:-
पालघर तालुक्यात 6 दिवसांत 109 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 676 झाला आहे. त्यातील 489 जण बरे झाले असून 176 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 3 ने वाढून 11 झाली आहे.
वाडा तालुक्यात 6 दिवसांत 8 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 314 झाला आहे. त्यातील 252 जण बरे झाले असून 52 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 कायम राहिली आहे.
जव्हार तालुक्यात 6 दिवसांत 2 नवा रुग्ण आढळला असून एकूण आकडा 154 झाला आहे. त्यातील 146 जण बरे झाले असून 6 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 राहिली आहे.
विक्रमगड तालुक्यात 6 दिवसांत 5 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 124 झाला आहे. त्यातील 111 जण बरे झाले असून 11 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 1 ने वाढून 2 झाली आहे.
डहाणू तालुक्यात 6 दिवसांत 64 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 226 झाला आहे. त्यातील 135 जण बरे झाले असून 91 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. येथे मागील 24 तासांत नवे 27 रुग्ण निष्पन्न झाले.
मोखाडा तालुक्यात 6 दिवसांत नवा एकही रुग्ण आढळला नसून एकूण आकडा 30 कायम आहे. त्यातील सर्व जण बरे झाले आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.
तलासरी तालुक्यात 6 दिवसांत 55 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 80 झाला आहे. त्यातील 22 जण बरे झाले असून 58 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. येथे मागील 24 तासांत 48 रुग्ण निष्पन्न झाले.

Print Friendly, PDF & Email

comments