साधू हत्याकांड: सीआयडीने तपास पूर्ण करुन न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले!

दि. 16 जुलै (राजतंत्र न्यूज नेटवर्क): डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे जमावाने 2 साधू व त्यांच्या चालकांची दगडाने ठेचून हत्या केल्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने तपास पूर्ण केला असून डहाणू येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ह्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 165 जणांची धरपकड केली असून त्यातील 11 अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

16 एप्रिल रोजी 2 साधू मारुती इको व्हॅनमधून त्यांच्या गुरुच्या अंत्यसंस्कारासाठी गुजरात राज्यात जात असताना जमावाने रोखून अमानुषपणे मारहाण केली. घटनास्थळी पोलिस आल्यानंतरही पोलिसांच्या ताब्यातील साधू व त्यांचा चालक अशा 3 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ह्या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले तर संबंधित कासा पोलिस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद काळेंसह 5 अंमलदारांना निलंबित करुन जवळपास 40 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यासंदर्भातील जनक्षोभ लक्षात घेता राज्य सरकारने 21 एप्रिल रोजी ह्या प्रकरणांचा तपास राज्याच्या सीआयडीकडे (गुन्हे अन्वेषण विभाग) सोपविला होता. सीआयडीने काल, 15 जुलै रोजी संबंधित 2 गुन्ह्यांचा तपास पूर्ण करुन, गुन्हा घडल्यानंतर 3 महिने मुदतीत न्यायालयासमोर आरोपपत्र सादर केले आहे. आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबार प्रकरणी अजून तपास चालू आहे.

प्रस्तुत प्रकरणी पोलिसांनी कासा (तालुका डहाणू) पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एकाच घटनेच्या दोन्ही गुन्ह्यात (गुन्हा दाखल क्र. 76/2020 व 77/2020) आरोपपत्रामध्ये समान कलमे समाविष्ट केली आहेत. आरोपपत्रात समाविष्ट केलेली कलमे पुढीलप्रमाणे आहेत. – भारतीय दंडविधान संहितेचे कलम 302, 307, 34, 120 (ब), 109, 117, 143, 145, 147, 148, 149, 152, 153, 188, 201, 269, 270, 290, 332, 341, 342, 353, 427, 505(2) सह आपत्ती निवारण कायदा 2005 चे कलम 51(ब), 52, 54, साथरोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 2, 3, 4 व 5, महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचे कलम 37(1)(3), 135, महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 3 व 5.

सीआयडीने आतापर्यंत 808 संशयीतांची चौकशी केली असून 108 जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत. 154 सज्ञान व 11 अल्पवयीन अशा 165 आरोपींना ताब्यात घेतले आहे. एकालाही जामीन झालेला नाही. पहिल्या गुन्ह्याचा (क्र. 76) तपास सीआयडीचे डीवायएसपी विजय पवार यांनी केला असून काल 126 आरोपींच्या विरोधात 4 हजार 955 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तर दुसऱ्या गुन्ह्याचा (क्र. 77) तपास सीआयडीचे डीवायएसपी इरफान शेख यांनी केला असून त्यांनीही काल 126 आरोपींच्या विरोधात 5 हजार 921 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. अल्पवयीन आरोपींच्या विरोधात बाल न्यायालयात स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. 154 सज्ञान आरोपींना अटक केली असताना 126 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केल्याचे समोर आल्याने आरोपपत्रातून वगळलेल्या 28 जणांबाबत सीआयडीची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे.

Print Friendly, PDF & Email

comments