दि. 15 जुलै: लॉक डाऊनच्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा व प्रशासनाच्या व्यस्ततेचा काही मंडळी गैरफायदा घेताना दिसत आहेत. डहाणू तालुक्यातील राई गावाच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच लॉक डाऊनचे लाभार्थी ठरले आहेत. राई ग्रामपंचायतीतर्फे 9 जुलै (जा. क्र. 26) 2020 रोजी ” मेन रोड ते जनार्दन गोपाळ पटेल दरम्यान रस्ता बनविण्यासाठी दगड, रेती, खडी, सिमेंट ” खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणारी निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. इच्छूक पुरवठादाराने 15 जुलै रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायतीला बंद लिफाफ्यात दरपत्रक सादर करायचे होते. 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दरपत्रक उघडण्यात येणार होते. स्पर्धात्मक कमी दराचे दरपत्रक मंजूर केले जाणार होते. पण ह्याबाबत आधीच फिक्सींग झाल्याचे उघड झाले असून दरपत्रक मागवणारी निविदा केवळ फार्स ठरली आहे. 16 जुलैची पहाट होण्याआधीच व निविदा उघडण्याआधीच सर्व दगड, रेती, खडी, सिमेंट इत्यादीचा पुरवठा होऊन रस्ता तयार झाला आहे. एका कोंबड्याने रस्त्याचे उद्घाटन केल्याचे देखील छायाचित्रात दिसत आहे. ग्रामसेवक व सरपंच उद्या दरपत्रक उघडून बिले कोणाच्या नावावर निघणार ते जाहीर करणार आहेत. राई ग्रामपंचायत लॉक डाऊनची लाभार्थी बनली आहे.