बोर्डी ग्रामपंचायतीचे कोसळते आभाळ आणि निसटती वाळू

संजीव जोशी [email protected]
संपादक – दैनिक राजतंत्र / rajtantra.com
वैयक्तिक संपर्क : 9822283444
Rajtantra Media 9890359090

डहाणू तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीवर म्हणे 3 जुलै रोजी अफवांचे आभाळ कोसळले. 1 नागरिकाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असताना एका वर्तमानपत्रामध्ये 4 जणांना लागण झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे बोर्डी ग्रामपंचायत अस्वस्थ झाली. संबंधित वार्ताहाराने खोटी बातमी देऊन बोर्डीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचा कांगावा करण्यात आला. माहिती देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी करुन ग्रामपंचायतीला अहवाल सादर करावा असे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले. परस्पर वैद्यकीय अधिकारी यांना जाब विचारण्यात आला. त्यांच्या हवाल्याने संबंधित वर्तमानपत्राच्या संपादकांना पत्र लिहिण्यात आले. संबंधित बातमीमुळे चुकीचा संदेश जात असून गावात भितीचे वातावरण तयार झाल्याची भावना कळविण्यात आली. संबंधित बातमीदारावर कारवाईची मागणी देखील करण्यात आली. इतक्यावर न थांबता ही पत्रे सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आली. गावामध्ये ध्वनीक्षेपकावरुन लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असा संदेश देण्यात आला. जणू काही बोर्डी गावावर आभाळ कोसळल्याची चिंता ग्रामपंचायतीला वाटू लागली होती. हे सर्व केले जात असतानाच 3 जुलै रोजी बोर्डीमध्ये कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींची संख्या 5 ने वाढून 6 झाली. आणि गडगडाट करणारी ग्रामपंचायत तोंडावर आपटली. ध्वनीक्षेपकावरुन घोषणा करण्याची हौस बोर्डी गावावर प्रतिबंध लादण्यात भागवावी लागली.

बोर्डी: शेतीच्या नावावर उत्खनन, लाखोंच्या महसूलाला चुना लावला

स्वातंत्र्यसैनिकांचे गाव आणि शिक्षण पंढरी अशी ओळख असणाऱ्या बोर्डीतील ग्रामस्थ सहजासहजी चिंताग्रस्त होणारे नक्कीच नाहीत. ग्रामपंचायतीने बोर्डीतील लोक भयभीत झाल्याचा कितीही देखावा केला तरी लोकांना ते पटणार नाही. बोर्डी ग्रामपंचायतीची ही कृती वेगळ्याच इराद्याने केली गेली असावी असा निष्कर्ष काढायला वाव आहे. कोरोनाची आकडेवारी अधिकृत सुत्रांकडून खूप उशीरा मिळते. ठिकठिकाणची माहिती गोळा करुन देताना अनेकदा शासकीय आकडेवारीत देखील चूक होत असते. माहितीची देवाणघेवाण करतानाही आकडेवारीत एखादी चूक होऊ शकते. मात्र ती संधी साधून एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराविरोधात सोशल मिडीयावरुन घटीया पद्धतीने मोहीम चालवणे निंदनीय ठरते. बातमीत चूक झाली तर सनदशीर मार्गाने चुकीची दुरुस्ती अथवा खूलासा प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात काहीही गैर नाही. मात्र सुडबुद्धीने पत्रकारांना टार्गेट केले जात असेल तर मग आपले पाय मातीचे नक्कीच नसावेत. हे आकांडतांडव का करण्यात आले? उत्तर सोपे आहे. उत्तर शोधण्यासाठी कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आलेले रुग्ण कुठल्या ग्रामपंचायत सदस्यांचे कोण लागतात हे तपासले म्हणजे वाळू का निसटली ह्याचा बोध होईल. दमण येथून कोरोनाची लक्षणे आढळलेला रुग्ण बोर्डी येथे येऊन राहिल्यानंतर बोर्डी गाव बातमीचा विषय ठरले. बोर्डी ग्रामपंचायतीकडून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली किंवा नाही, ह्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी एकच पॉझिटीव्ह रुग्ण आल्याचे सांगून फुगलेला बोर्डी ग्रामपंचायतीचा बेडूक 24 तासांत आणखी 5 पॉझिटीव्ह आल्यानंतर फुटला आहे. अर्थात वाढलेल्या आकड्याबद्दल चर्चा करण्याऐवजी भविष्यात काय खबरदारी घेता येईल आणि सार्वजनिक आरोग्य कसे सुरक्षित राखले जाईल ह्याकडे लक्ष देणेच अधिक योग्य ठरणार आहे. एखाद्या घरात किंवा गावात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने कोणी काही अपराध केला असे मानण्याचे कारण नाही. शक्य ती सर्व खबरदारी घेणे आणि त्यातूनही काही उद्भवलेच तर सामूहिक भावनेने सर्वांनी मिळून त्यावर मात करणे हेच सद्या योग्य ठरेल. बोर्डी ग्रामपंचायत नेमकी उलटी वागली. अनावश्यक राजकारण खेळून मोकळी झाली.

सध्या लॉक डाऊनच्या कालावधीत ग्रामपंचायतीला जर करण्यासारखी कामे नसतील आणि फुरसत असेल तर अशा उपद्व्यापात वेळ खर्ची करण्याऐवजी अन्य करण्यासारखे खूप आहे. ग्रामपंचायतीला निसटलेल्या वाळूच्या चौकशीत वेळ घालवता येईल. राकेश नहार उर्फ पिंकी आणि हेमंत दमणकर यांना चालू वर्षी लॉक डाऊनच्या काळात वहिंद्र खाडीतून शेकडो ब्रास उत्खनन करण्यासाठी बोर्डी ग्रामपंचायतीने मागील वर्षीच्या तारखेचा दिलेला ना हरकत दाखला खरा होता की खोटा? लॉक डाऊन मुळे ग्रामपंचायतीच्या सभा होत नसल्याने गेल्यावर्षीच्या सभेत न झालेला ठराव घुसवून ना हरकत दाखले दिल्याचे दाखवले किंवा कसे? उत्खननासाठी ना हरकत देताना किती गाळ काढता येईल याबाबत सक्षम प्राधिकरणाने दाखला दिला आहे किंवा नाही? ह्या प्रकरणात कोणी माती खाऊन डोळे तर बंद केले नाहीत ना? अशा अनेक प्रश्नांची ग्रामपंचायतीला उत्तरे शोधणे शक्य होते. आधी शक्य नसेल झाले तर आता शोधावीत. त्यामध्ये बोर्डी गावाचे हित साधले जाईल. उगाचच पत्रकारांना अनावश्यक टार्गेट बनवून शक्ती खर्ची न करता, ग्रामपंचायतीने भविष्यात बोर्डी गावाची उज्वल परंपरा जपणे आणि त्या परंपरेला साजेसा कारभार करणे अधिक औचित्याचे ठरणार आहे.

Print Friendly, PDF & Email

comments